लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजपच्या किती आमदारांनी मतदारांच्या अपेक्षा पूर्ण केल्या हे जाणून घेण्यासाठी पक्ष लवकरच कार्यकर्त्यांमार्फत सर्वेक्षण करणार आहे. यापूर्वीच पक्षाने मंत्र्यांनी ADES लोकांसह कार्यकर्त्यांच्या भेटी घ्याव्यात असे सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी काल, मंगळवारी पणजीत पक्षाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सदानंद तानावडे म्हणाले की, पक्षाच्या प्रत्येक आमदार, मंत्र्याने लोकांसाठी उपलब्ध असायला हवे. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्याही काही अडचणी असतात त्या जाणून घ्यायला हव्यात त्या अनुषंगाने एक मंत्री प्रत्येक आठवड्याला मंगळवारी भाजप कार्यालयात बसेल तसेच मंत्री दर बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी दोन तास मंत्रालयात लोकांना भेटतील.
राज्यात गाजत असलेल्या सांकवाळच्या भुतानी मेगा प्रकल्पाबद्दल विचारले असता तानावडे म्हणाले की, सरकारने अर्थात नगर नियोजन खात्याने भुतानीला नोटीस बजावलेली आहे. त्यामुळे यावर मी बोलू इच्छित नाही त्यांच्या उत्तरातून काय बाहेर येते पाहू. परवाने कधी दिले वगैरे कळेल. डीएलएफ प्रकल्पाला भाजप सरकारने परवाने दिलेली नाही. ती कोणी दिले हे तुम्ही तपासा, असे तानावडे म्हणाले. परंतु त्याचबरोबर हा प्रकल्प पाहताना मलाही वाईट वाटते, असे खेदजनक उद्गार त्यांनी काढले.
तानावडे म्हणाले की, आज २५ रोजी भाजपकडून राज्यभरात मेगा सदस्य नोंदणी हाती घेतली जाईल. आतापर्यंत ८० हजार सदस्य झाले असून साखळी मतदारसंघात सर्वाधिक सदस्य नोंदणी झालेली आहे. राज्यभरातील सदस्य आकडा आज १ लाख पार करील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कर्नाटकातील भाजप खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी हे खास उपस्थित राहणार आहेत. सर्व मंत्री, आमदारांनी आपापले नियोजित कार्यक्रम पुढे ढकलावेत व या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन तानावडे यांनी केले आहे.
तीन महिन्यांत रिपोर्ट कार्ड देईन : खंवटे
दरम्यान, पर्वरी येथे एका कार्यक्रमावेळी पत्रकारांशी बोलताना पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले की, माझ्या मतदारसंघात मी लोकांना भेटण्याचे काम सुरु केले आहे. दर रविवारी अधिकांऱ्याना सोबत घेऊन प्रभागनिहाय मी लोकांना भेटतो. त्यांच्या समस्या, अडचणी, सूचना ऐकून घेतो. लोकांचा मला चांगला प्रतिसाद मिळतो. मंत्री म्हणून पर्वरीवासीयांसाठी कोणकोणती कामे केली. यापुढे काय करणार आहे, यासंबंधीचे रिपोर्ट कार्ड पुढील तीन महिन्यात मी देईन.
ही तर सर्व मंत्र्यांची सामुहिक जबाबदारी
भाजपा कार्यालयात कार्यकर्त्यांची गाह्राणी ऐकल्यानंतर माविन गुदिन्हो पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आम्हा सर्व मंत्र्यांना लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत. लोकांचे प्रश्न धसास लावणे ही सर्व मंत्र्यांची सामुहिक जबाबदारी आहे. त्यामुळे दर मंगळवारी भाजप कार्यायात एक मंत्री बसेल. दर बुधवारी मंत्रालयात सर्व मंत्री लोकांना उपलब्ध असतील. तसा निर्णय पक्षाने घेतला आहे व आम्हा सर्व मंत्र्यांना तो बंधनकारक आहे. लोकांना भेटल्यामुळे काही बाबतीत जागीच निर्णय घेता येतील. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबध्द आहे.