लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात भाजपने आमदार आयात करू नयेत, असे सांगितले असले तरी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी भाजपने आमदार आयात केले नसल्याचे म्हटले आहे. जे कुणी स्वेच्छेने भाजपात आले त्यांना दारे खुली करणे म्हणजे आयात करणे नव्हे, असे म्हटले आहे.
स्पष्टवक्ते असलेले भाजपचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय मंत्री गडकरी यांनी गोवा भेटीदरम्यान पक्षातल्या राज्यातील कारभारावर अप्रत्यक्षपणे ताशेरे ओढताना आमदारांची आयात करू नका, असे बजावले होते. गडकरी यांची ही सूचना कशी घेता, असे विचारले असता मंत्री फळदेसाई यांनी सांगितले की, आम्ही आमदार आयात करीत नाहीत. जे कुणी आमदार पक्षात घेतले गेले ते भाजपची ध्येयधोरणे पटल्यामुळे स्वतःहून आले होते. त्यामुळे त्यांना पक्षाची दारे खुले करणे म्हणजे आयात करणे ठरत नाही, असे ते म्हणाले.
विकासकामांच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केलेल्या टीकेला उत्तर देताना फळदेसाई म्हणाले की, काँग्रेसला विकासावर बोलण्याचा अधिकारच नाही. काँग्रेसने राज्यात खूप दीर्घकाळ सत्ता भोगली आहे. सत्ता काळात काँग्रेसला जे जमले नाही ते भाजपने करून दाखवले आहे.
भाजपचे प्रवक्ते अॅड, यतीश नायक म्हणाले की, काँग्रेसने सत्ताकाळात अनेक घोटाळे करून पक्ष बदनाम केल्यामुळे यूपीए हे नाव बदलून इंडिया अलायन्स नाव ठेवावे लागले. मागील तीन निवडणुकांत राष्ट्रीय स्तरावर हा पक्ष दोन अंकी संख्येवर अडकून पडला आहे तर भाजपाने सतत तिसऱ्यांदा सत्ता मिळविली आहे, असे ते म्हणाले. पक्षाचे प्रवक्ते प्रेमानंद म्हांबरेही उपस्थित होते.
'सनबर्न' विषयी लोकभावना कळवू
सनबर्न दक्षिण गोव्यात होत असल्याची केवळ चर्चा आहे. सनबर्न असो किंवा इतर काहीही असो, लोकांना हवे असेल तरच होणार आणि लोकांना नको असेल तर होणार नाही, असे मंत्री फळदेसाई यांनी म्हटले आहे. भाजपच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, ते लोकांच्या भावना मुख्यमंत्र्यांना कळवतील.