पणजी : राज्यातील अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या आमदार मतदारांशी डिसकनेक्ट झाले आहेत. यामुळेच काही मतदारसंघांमध्ये नागरिकांनी आमदार हरवल्याचे पोस्टर लावले आहेत.
सरकारने सरकारी यंत्रणेपेक्षा आमदार, पंच, नगरसेवक हेच लोकांना धान्य वाटप करतील असे जाहीर केले होते. मात्र काही भाजपचे व एक काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार सध्या मतदारांच्या संपर्कातच नाही. वास्को व म्हापशात आमदार मिसिंग असे काही फलक लागले आहेत. सोशल मिडियावर या पोस्टरांचे फोटो झळकत आहेत.
गेले सात दिवस चाळीस टक्के आमदार आपल्या मतदारसंघात सुध्दा गेलेले नाहीत. यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळातील दोघा मंत्र्यांचा देखील समावेश आहे. बाबू आजगावकर हे पडणे मतदारसंघात पोहचलेले नाही. आमदार नीळकंठ हळर्णकर, टोनी फर्नांडिस, ग्लेन तिकलो यांचेही दर्शन लोकांना झालेले नाही. काही मंत्री व आमदारांनी दुकानांमधील सगळाच माल खरेदी करुन स्वतःकडे मालाचा स्टाॅक करुन ठेवला आहे. तिसवाडीतील एक आमदार दोन मतदारसंघांमध्ये स्वतः च्या मतदारांना कडधान्ये व भाजी वाटतोय. कोणत्याच राजकीय पक्षाशी संबंध नसलेल्या बहुतेक लोकांना मात्र घरपोच धान्य मिळत नाही व दुकाने उघडी केली तर दुकानांवरही सामान नाही असे आढळून येते.
दुकाने उघडताच मालावर राजकीय कब्जा
पणजी व ताळगाव परिसरातील काही दुकाने जर उघडली गेली तर लगेच तिथे राजकीय नेत्यांचे प्रमुख कार्यकर्ते येतात व सगळा माल भराभर विकत घेतात. या मालाचा साठा करून मग स्वतःच्या व्होट बॅंकेपुरता त्या मालाचा पुरवठा केला जात आहे. अन्य काही तालुक्यांतही हे प्रकार सुरु आहेत.
कामगारही गायब
दोघा दुकानदारांनी सांगितले की आम्ही माल आणण्यासाठी पणजी बाजारातील घाऊक विक्रेत्यांकडे गेलो तर 50 किलोचे मोठे पोते उचलून गाडीत घालण्यासाठी कामगारच उपलब्ध नाही. पूर्वी आम्हाला दुकानात येऊन माल घातला जात होता पण आता आम्हाला माल आणायला जावे लागते पण कामगार नसल्याने जास्त माल आम्ही आणू शकत नाही. परिणामी आमचा माल लगेच संपतो व आम्हाला दुकान बंद ठेवावे लागते.