सुशांत कुंकळयेकर
मडगाव - ऐन लॉकडाऊच्या काळात लग्न उरकत लगेच गोव्यात दाखल होऊन आपल्या फॅन्सना एका पाठोपाठ एक धक्का देणारी वादग्रस्त मॉडेल पूनम पांडे हिची आणखी एक धक्का देणारी बाब पुढे आली आहे. गोव्याच्या वास्तव्यात पूनम गरोदर राहिली असून ती 6 आठवड्याची गरोदर असल्याचं तिला तपासणाऱ्या डॉक्टरांनी म्हटलं आहे. दरम्यान पूनम आणि तिचा पती सॅम बॉम्बे या दोघांनी आपल्याला मुंबईला जाण्यासाठी काणकोण न्यायालयाकडे मागितलेली परवानगी शुक्रवारी मान्य केली असून शनिवारी रात्री ते दोघे मुंबईला रवानाही झाले होते.
काणकोण येथे 'तो' वादग्रस्त पॉर्न व्हिडीओ शूट केल्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्या दोघांना जामीन देताना काणकोण न्यायालयाने सहा दिवस काणकोण पोलीस स्थानकावर हजेरी देण्याची अट घातली होती. त्याचबरोबर गोवा सोडून राज्याबाहेर जायचे असल्यास न्यायालयाची परवानगी घेण्याची अट घातली होती. त्या दरम्यान पूनमने वार्का येथील डॉ. आर. जी. प्रभुगावकर यांच्याकडून तपासणी करून घेतली असता त्यांनी ती सहा आठवड्याची गरोदर असून तिला विश्रांती घेण्याची गरज असल्याचा दाखला दिला होता.
पूनमने आपल्या या अवस्थेचा दाखला देऊन तसेच सॅमने आपल्याला मुंबईत एक फिल्म आणि एक डॉक्युमेंटरी शूट करायची असल्याचे कारण सांगून परत मुंबईत जाण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली असता न्या. शानुर अवदी यांनी अतिरिक्त हमीच्या अटीवर त्यांना गोवा सोडण्यास शुक्रवारी मंजुरी दिली. यावेळी पुनम व सॅमच्या वतीने बाजू मांडताना बायरन रोड्रिग्स यांनी त्या दोघांचे गोव्यात घर नसल्याने त्यांना हॉटेलात राहावे लागते या गोष्टीकडे लक्ष वेधताना संचार स्वातंत्र्य हा कुणाचाही मूलभूत अधिकार असून कोणा व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद झाला तरी त्यांचे व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेता येणे शक्य नाही असा दावा केला होता.
पूनमला मिळालेला जामीन रद्द करावा यासाठी तक्रारदार सम्राट भगत यांनी दक्षिण गोव्यात दाखल केलेल्या आव्हान अर्जावर सुनावणी 21 नोव्हेंबर रोजी ठेवल्याने पूनमवर आपली लग्नानंतरची पहिली दिवाळी गोव्यातच साजरी करण्याची वेळ आली होती मात्र काणकोण न्यायालयाच्या परवानगीमुळे त्यांना दिवाळीच्या दिवशीच शेवटी घरी जाण्यास मिळाले.