पणजी : फेसबुकवर मैत्री करून अल्पवयीन व तरुण मुलींचे फोटो घेऊन त्यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी पोलिसांच्या सायबर विभागातील अधिकाऱ्यांनी बोरी येथील चंद्रहास राणे (३६) याला अटक केली आहे. अधिक चौकशीसाठी त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. चंद्रहास हा फेसबुकवर बोगस प्रोफाईल बनवून आपण महिला असल्याचे व आपली आॅनलाईन मॉडेलिंग एजन्सी असल्याचे भासवून त्यांच्याशी मैत्री करायचा व मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याची संधी देण्याचे व गलेलठ्ठ मोबदला देण्याचे आमिष दाखवायचा. अल्पवयीन व तरुण मुलीच त्याचे टार्गेट होते. या मुलींशी चॅटिंग करून त्यांचे फोटो पाठवायला सांगत असे. या मुलींकडे तो अर्धनग्नावस्थेतील तसेच नग्न फोटोंचीही मागणी करायचा. नंतर खरेपणासाठी त्यांचा फेसबुक पासवर्ड मागायचा. मुलींनी पासवर्ड दिल्यानंतर फेसबुक अकाउंट ताब्यात घेऊन त्यांचे ब्लॅकमेलिंग करत असे. किमान दहा मुलींचे त्याने अशा पद्धतीने नग्न फोटो मिळविले. म्हापशातील एका महिलेने आपल्या मुलीच्या बाबतीत असा प्रकार घडल्याची तक्रार नोंदविल्यानंतर याची वाच्यता झाली. आपल्या मुलीचा बोगस प्रोफाईल तयार करण्यात आला आणि तिला ब्लॅकमेल केले जात असल्याची तिची तक्रार होती. दरम्यान, चार वर्षांपूर्वी निवास सोडलेल्या पत्त्यावर त्याने इंटरनेट कनेक्शन घेतले होते. केवळ रात्रीच्यावेळीच तो नेटचा वापर करीत असे. ट्रेस होऊ नये यासाठी वरचेवर जागा बदलत असे. तक्रारदार महिलेच्या मुलीचे १२५ नग्न फोटो संशयिताकडे आढळून आले. एकूण १0 वेगवेगळ्या मुलींचे नग्न फोटो त्याच्याकडे सापडले आहेत. पोलिसांनी आयटी कायद्याच्या कलम ६७ तसेच गोवा बाल कायद्याच्या कलम ८ (२) खाली गुन्हे नोंदविले आहेत. निरीक्षक राजेश जॉब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे. (प्रतिनिधी)
मॉडेलिंगच्या मोहापायी ‘त्यांनी’ दिली नग्न छायाचित्रे
By admin | Published: September 24, 2016 2:40 AM