लोकमत न्यूज नेटवर्क, पर्वरी: गेल्या नऊ वर्षांच्या सत्ताकाळात केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लोककल्याणाला प्राधान्य देऊन देशहितकारक कार्य केल्याचे प्रतिपादन भाजपचे गोवा राज्य प्रभारी तसेच कर्नाटकचे माजी मंत्री सी. टी. रवी यांनी आज पर्वरी येथे केले.
भाजपच्या संपर्क से समर्थन अंतर्गत मोहिमेत सहभागी झालेले सी. टी. रवी हे सुकूर पंचायत क्षेत्रातील वेताळ महारूद्र संस्थानाजवळ आयोजित शेतकरीवर्गाच्या बैठकीला संबोधित करताना बोलत होते. त्यांच्यासमवेत पर्यटन तथा माहिती तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, पर्वरी मंडळ अध्यक्ष किशोर अस्नोडकर तसेच सरपंच, पंच सदस्य व जिल्हा पंचायत सदस्य उपस्थित होते.
गेल्या नऊ वर्षांतील मोदी सरकारच्या कार्याची माहिती त्यांनी यावेळी आपल्या भाषणात सविस्तरपणे उपस्थितांना दिली. रवी यांनी पर्वरी मतदारसंघातील साई मंदिर, वेताळ महाररुद्र देवस्थानाला भेट दिली व देवतांचे आशीर्वादही घेतले. साई मंदिराचे पदाधिकारी सेल्वराज गौंडर, वेताळ महारुद्रचे अध्यक्ष व माजी उपसभापती उल्हास अस्नोडकर यांनी रवींसह मंत्री खंवटे व प्रदेशाध्यक्ष तानावडे यांचे स्वागत केले. पारंपरिक पद्धतीनेही त्यांचे विविध ठिकाणी जोरदार स्वागत झाले. पर्वरी मतदारसंघातील काही मान्यवरांच्या देखील रवी यांनी, मंत्री खंवटे व प्रदेशाध्यक्ष तानावडे व अन्य पक्ष पदाधिकारी वर्गासमवेत वैयक्तिक भेटी घेतल्या.
यावेळी त्यांनी विविध स्तरांतील मान्यवरांशी संवाद साधला व मोदी सरकारच्या कार्याची माहिती पुस्तिका त्यांना भेटविली. पीएनटी वसाहत, सुकूर पंचायत कार्यक क्षेतील काही मान्यवरांना ते भेटले. त्यात अॅड. जगन्नाथ मुळगावकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. सिडनी पिंटो, इब्राहीम आगा आदींचा समावेश होता. खरगे गावच्या स्वयंसेवी गट सदस्यांच्या बैठकीतही त्यांनी मार्गदर्शन केले.
स्टार्टअपद्वारे उद्योगाला बळकटी : सी. टी. रवी
केंद्रातील मोदी सरकारने भारताला आत्मनिर्भर करण्याच्या हेतूने स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योगक्षेत्राला बळकटी दिली. कृषिप्रधान भारतातील बळीराजाच्या समृद्धी योजनांना प्राधान्य दिले, आरोग्य क्षेत्रात जनतेला आरोग्यविम्याचे सुरक्षाकवच उपलब्ध केले. पर्यटन समृद्धीसाठी देखो अपना देश संकल्पनेखाली देशी पर्यटन वृद्धीला महत्त्व दिल्याचे सी. टी. रवी यांनी सांगितले.
मोदींनी शेतकऱ्यांचे हित जपले : खंवटे
पर्यटनमंत्री खंवटे यांनी मोदी सरकारच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांच्या नऊ वर्षातील नेत्रदीपक कामगिरीमुळेच आज भारत जगात अव्वल होण्याच्या वाटेवर असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे हित मोदी सरकारने जोपासल्याचे सांगून गोवा सरकारही शेतकऱ्यांच्या हितासाठी समर्पित असल्याचे ते म्हणाले. केंद्रातील मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.