ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 9 - मोनिका घुराडेचा तिच्या अपार्टमेंटच्या सुरक्षा रक्षकानेच खुन केल्याचे पोलिस तपासातून आढळून आले आहे. खून पळून बंगळूरला पळून गेलेल्या या सुरक्षा रक्षकाला कर्नाटक पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आले आहे. कामावरून काढून टाकल्याच्या रागाने त्याने हा खून केल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्श आहे. या सुरक्षा रक्षकाचे नाव राजकुमार सिंह असे असून तो मूळ पंजाब येथील आहे. मोनिका राहत असलेला फ्लॅट ज्या अपार्टमेंटमध्ये आहे त्याच अपार्टमेंटचा तो सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. त्याच्या विरुद्ध काही लोकांनी तक्रारी केल्यामुळे त्याला दोन महिन्यापूर्वीच त्याला काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे त्याचा सर्व राग मोनिकावर काढून तिचा खून केल्याचा प्राथमिक निष्कर्श पोलिसांनी काढला आहे. पोलीस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांनी ही माहिती दिली. संशयिताने आपला गुन्हा कबूल केल्याचेही गुप्ता यांनी सांगितले. दरम्यान तिच्यावर संशयिताने बलात्कार केला होता की नाही या बाबतीत अजून पोलिसांनी काहीच माहिती दिली नाही. संशयित हा गुरुवारी रात्री मोनिकाच्या घरी आला होता. तो ओळखीचा असल्यामुळे तिने दार उघडले असावे. नंतर सुरीचा धाक दाखवून त्याने तिला बांधून ठेवले. उशीने तिचे तोंड दाबून आणि गळा आवळून खून केला. घरातून पैसे व दोन मोबाईल घेऊन तो पळाला. पर्वरी येथे एका एटीएममधून त्याने पैसे काढले. त्यानंतर तो थेट मंगळूर येथे गेला. तेथे काही खरेदी केली. खरेदीसाठी त्याने मोनिकाचे एटीएम कार्ड वापरले होते. त्यानंतर तो बंगळूरला गेला आणि तेथील कॉटनपेट नावाच्या एका हॉटेलमध्ये तो थांबला. मंगळूर पोलिसांच्या मदतीने संशयिताचा फोटो आणि इतर सर्व माहिती पोलीस पथकाने मिळविली आणि बंगळूर पोलिसांच्या मदतीने त्याला हॉटेलमध्ये जाऊन पकडण्यात आले. या मोहिमेत उत्तर जिल्हा पोलीस, क्राईम ब्रँच आणि कर्नाटक पोलिसांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.
सुरक्षारक्षकानेच केला मोनिकाचा खून
By admin | Published: October 09, 2016 8:31 PM