सत्तरी : शिरोली-केरी येथे माकडतापचा दुसरा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. येथील भाग्यलक्ष्मी उत्तम गावस (४२) यांना बुधवारी संध्याकाळी वाळपईच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना माकडतापाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, वाळपई इस्पितळात सध्या माकडतापाचे दोन रुग्ण उपचार घेत आहेत.माकडतापाचा दुसरा रुग्ण आढळून आल्याने शिरोली गाव दडपणाखाली आला आहे. यापूर्वी येथील आत्माराम गावस यांना माकडतापाची लागण झाली होती. उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली आहे. दरम्यान, बुधवारी येथील भाग्यलक्ष्मी गावस यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे वाळपई इस्पितळात दाखल केले असता त्यांनाही केएफडीची लागण झाल्याचे निदान झाले आहे. वाळपई इस्पितळाचे डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, वाळपई इस्पितळात आणखी एक रुग्ण दाखल झाला असून त्यालाही माकडतापची लागण झाल्याचे इस्पितळ सूत्रांनी सांगितले.दरम्यान, शिरोली परिसरात गेल्या काही दिवसांत सात मृत माकडे आढळून आली आहेत. माकडताप हा बाधित माकडांवर असलेल्या किरट्यांमुळे फैलावत असल्याने सध्या लोकांना जंगल परिसरात जाणे कठीण झाले आहे.
शिरोलीत आढळला माकडतापाचा दुसरा रुग्ण
By admin | Published: March 03, 2017 1:47 AM