पणजी : राज्याचे मुख्य माहिती आयुक्तपद आणि दोन राज्य माहिती आयुक्तपदे येत्या पावसाळ््यापूर्वी भरली जातील, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शनिवारी येथे पत्रकारांना सांगितले.आपल्याकडे फाईल आलेली आहे. अनेक उमेदवारांची नावे आहेत. आम्ही पावसाळ््यापूर्वी तिन्ही पदांसाठी उमेदवारांची निवड करू, असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या जानेवारीपासून मुख्य माहिती आयुक्तपद रिकामे आहे. तत्पूर्वीच्या काळापासून दोन राज्य माहिती आयुक्तपद रिकामी आहेत. माहिती आयुक्तपदे भरण्यासाठी यापूर्वी दोन वेळा सुरू केली गेलेली प्रक्रिया सरकारने रद्दही केली. गेल्या महिन्यात सरकारने नव्याने जाहिराती देऊन मुख्य माहिती आयुक्त व राज्य माहिती आयुक्त अशी तीन पदे भरण्यासाठी नव्याने प्रक्रिया सुरू केली व अर्ज मागविले. येत्या बुधवारी सरकारच्या समितीची बैठक होणार असून त्या वेळी नावांवर चर्चा केली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. दरम्यान, खनिज खाण व्यवसाय येत्या आॅक्टोबरपासून निश्चितच सुरू होईल, असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. कर्नाटकचे मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी बायणा येथे जाऊन जी प्रक्षोभक विधाने केली, त्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी भाजपने केली होती. सरकार देशपांडे यांच्याविषयी कारवाई करणार काय असे पत्रकारांनी विचारले असता, पार्सेकर यांनी नकारार्थी उत्तर दिले. (खास प्रतिनिधी)
पावसाळ्यापूर्वी माहिती आयुक्तपदे भरू : पार्सेकर
By admin | Published: April 19, 2015 1:04 AM