पणजी : राज्यात उद्यापासून मच्छिमारीबंदी लागू होत असून एकूण ६१ दिवस ही बंदी ३१ जुलैपर्यत लागू असणार आहे. मच्छिमारी खात्याने काढलेल्या आदेशानुसार यांत्रिकी बोटी ज्या पर्सीननेट तसेच ट्रॉल नेट मासे मारण्यासाठी वापरतात त्या सर्व बोटींना ही बंदी लागू असणार आहे. १0 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या नोंदणीकृत लहान यांत्रिकी होड्या ज्या गिल नेट वापरतात त्यांना बंदीतून वगळण्यात आले आहे. पावसाळ्यातील हा काळ मासळीच्या प्रजननाचा काळ असल्याने ही बंदी लागू केली जाते. राज्यात एक हजारहून अधिक ट्रॉलर्स असून मासेमारीबंदीमुळे हे सर्व ट्रॉलर्स आजपासून किनाºयावर नांगरलेले दिसतील. मालिम, कुटबण, शापोरा, वास्को आदी जेटींवरील ट्रॉलर्सवर काम करणारे खलाशी गांवी परतले आहेत.
मान्सून गोव्यात ५ जून नंतरच
पणजी: कर्नाटकात गोव्याच्या दक्षीण सीमेनजीक येऊन ठेपलेला मान्सून तीन दिवस तरी पुन्हा सक्रीय होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे केरळात वेळे अगोदर दाखल झालेला मान्सून गोव्यात सामान्य वेळेतच म्हणजे ५ जूननंतरच पोहोचणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. अंदमान निकोबार बेटांवर २५ मे रोजी पोहोचलेला मान्सून गतीमान होवून चार दिवसातच केरळ किनारपट्टीवर थडकला होता. तसेच केवळ चोवीस तासात केरळहून कर्नाटकमधील कारवार जिल्ह्यापर्यंत तो ३० रोजी पोहोचला होता. त्यामुळे ३१ पर्यंत गोव्यात पोहोचणार अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत होती. परंतु कारवारमध्ये मान्सून पहोचल्यानंतर मान्सूनचा एक टप्पा पूर्ण ओसरला होता. गतीमान मान्सून १०० टक्के गतिहीन झाल्याचे ३० मे रोजीच हवामान खात्याचे संचालक एम एल साहू यांनी लोकमतशी बोलताना सांगितले होते. त्यामुळे पुढील टप्प्यातील मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण होईपर्यंत किमान तीन चार दिवस तरी लागणार आहेत. त्यामुळे मान्सून गोव्यात नियोजित वेळेतच म्हणजेच ५ जून नंतरच मिळेल अशी माहिती साहू यांनी दिली. जुलै महिन्यात देशात भरपूर पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याच्या दुसºया मान्सून बुलेटीनमध्ेय म्हटले आहे. ९५ टक्क्याहून अधिक पाऊस जुलै मध्ये पडणार असे त्यात म्हटले आहे. ज्या भागात पाऊस पडणार असल्याचे म्हटले आहे त्यात गोव्याचाही समावेश असल्यामुळे हा महिना गोव्यालाही लाभदायक ठरणार आहे. ऑगस्टमध्ये मात्र पाऊस कमी असेल असे बुलेटीनमध्ये म्हटले आहे.