लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : रेमेल चक्रीवादळामुळे गतिमान झालेला नैऋत्य मान्सून सुसाट झाला असून येत्या ४८ तासांत तो भारतीय उपखंडात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात अगदी वेळेत किंवा वेळेअगोदरही मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी राज्यात ११ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. मागील बऱ्याच दिवसांपासून पडत असलेल्या - पावसाच्या सरींनी शनिवारपासून उसंत घेतली आहे. परंतु २ जूनपर्यंत पुन्हा पावसाच्या सरी कोसळतील, असे हवामान खात्याने म्हटले आहे. परंतु त्यानंतरही पावसाच्या सरी कोसळतीलच. परंतु त्या मान्सूनपूर्व सरी असतील. मान्सून केरळात दाखल झाल्यावर सामान्य परिस्थितीत मान्सून ४ ते ५ दिवसांनी राज्यात पोहोचत असतो. त्यामुळे हवामानात विशेष बदल न झाल्यास यंदा गोव्यात मान्सूनची ५ जून ही सामान्य वेळ राखली जाईल अशी अपेक्षा आहे. त्यापेक्षा लवकरही पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्यावर्षी पावसाला काहीसा उशिर झाला होता.
हवामान खात्याने राज्यात २ जूनपर्यंत तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. ढगाळ वातावरण असले तरी राज्यातील पारा चढाच आहे. राज्यात २ जूनपर्यंत कमाल तापमान ३४ अंशापर्यंत राहील असा अंदाज खात्याने वर्तविला आहे. मात्र रेमल चक्रीवादळ बंगालच्या किनाऱ्यावरून भारतीय भूभागात शिरल्यामुळे चक्रीवादळाचा वेग कमी झाला आहे. हे अधिक प्रमाणात मंदावल्यास पुन्हा त्यामुळे मान्सून मंदावू शकतो.
दरम्यान, १ मार्च ते २७ मे यादरम्यान राज्यात सरासरी ११९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सामान्य पावसापेक्षा हे प्रमाण अधिक आहे. नेहमी या कालावधीत राज्यात साधारपणे ४८.८ मिमी पावसाची नोंद होते. यंदाचा मान्सूनपूर्व पाऊस ४ इंचाहून अधिक नोंद झाला आहे.