ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 10 - गोव्यात मान्सून स्थिरावलेला आहे. शनिवारी पहाटेपासून राज्याच्या बहुतेक भागात मुसळधार पाऊस कोसळला. राजधानी पणजीत तर रस्त्यावर खूप पाणी साचल्याने वाहनचालकांना त्रास झाला.
दरम्यान, येत्या 48 तासांत मुंबईसह कोकणामध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसंच सतर्क राहण्याचं आवाहनसुद्धा करण्यात आलं आहे. मान्सून महाराष्ट्रात पुढे सरकला असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता उकाड्याने हैराण मुंबईकर दमदार पावसाने आता चांगलेच सुखावणार आहेत.
राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर ठिकठिकाणी पावसाची दमदार बॅटिंग सुरू असून, भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी नैर्ऋत्य मोसमी पाऊस कोकणाच्या, अंतर्गत कर्नाटकाच्या, रायलसीमाच्या व आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या आणखी काही भागात दाखल झाला आहे.
फोटो - पिनाक कल्लोळी
गोवा - दिवसभर झालेल्या मुसळदार पावसाने बोर्डा येथील रस्त्यावर असे पाणी जमले होते.
मागील २४ तासांत कोकण, गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मान्सून वेगाने पुढे सरकत असतानाच मुंबईतही पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत.
गुरुवारी रात्री मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात दमदार हजेरी लावलेल्या पावसाने शुक्रवारी सकाळी किंचितशी बरसात केली. त्यानंतर आकाश मोकळे झाल्याने पडलेल्या प्रखर सूर्यकिरणांनी मुंबईकरांना अक्षरश: घाम फोडला. आणि पुन्हा दुपारी दाटून आलेल्या ढगांनी दुपारसह सायंकाळी मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार हजेरी लावली.
सायंकाळी झालेल्या पावसामुळे मुंबईत चांगलाच गारवा निर्माण झाला होता. एकंदर उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मान्सूनपूर्व दमदार सरींनी दिलासा दिला असून, पडलेल्या पावसामुळे मुंबईकर सुखावले आहेत.