पणजी - महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी आज मंगळवारी पर्वरी येथे विधानसभा संकुलात गोव्याचे सभापती रमेश तवडकर यांची सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना नार्वेकर म्हणाले की, मोपा विमानतळ महाराष्ट्रालाही फायदेशीर ठरेल तसेच नागपूर-गोवा कॉरिडोअर उभय राज्यांमधील व्यापार, व्यावसायिक संबंध अधिक दृढ करण्यास मदत करील.
नार्वेकर म्हणाले की, मी मुंबईत असलो तरी मूळ गोमंतकीय आहे. गोव्यात माझ्या पूर्वजांचे घर आहे. गोवा विधानसभेतील डिजिटलायझेशन, इ विधान उपक्रम याबद्दल मी तवडकर यांच्याकडून जाणून घेतले आणि निश्चितपणे या माहितीचा फायदा मी महाराष्ट्रात सभापती म्हणून कामगिरी बजावताना करीन. माझा जन्म, शिक्षण मुंबईत झाले असले तरी मी मूळ गोवेकर आहे. नार्वे येथील सप्तकोटेश्वर माझे कूलदैवत आहे. गोव्यात माझे वरचेवर येणे-जाणे असते. गोव्याचे पर्यटन कसे वाढेल याकडे माझे जास्त लक्ष असते.