लोकमत न्यूज नेटवर्कमोपा : ‘मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे केवळ गोव्याला नव्हे तर लगतच्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांच्या अपेक्षापूर्ती झाली आहे. हा विमानतळ एक महत्त्वाचा उर्जास्रोत बनेल. भविष्यात सामान्य माणसालाही विमान प्रवास सोयीस्कर व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे’ असे प्रतिपादन केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला.
देशातील विमान वाहतूक क्षेत्रातील प्लाय ९१ ही नव्या कंपनीच्या पहिल्या व्यावसायिक फ्लाइटच्या तिकीट विक्रीसाठी बुकिंग सुरू करण्यात आले. उद्घाटनाच्या टप्प्यात, प्रादेशिक विमान कंपनी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि बेंगळुरू आणि हैदराबाद दरम्यान साप्ताहिक उड्डाणे तसेच सिंधुदुर्ग ते बेंगळुरू आणि हैदराबाद यांदरम्यान कनेक्टिव्हिटी ऑफर करीत आहे. कंपनीच्या विमान उड्डाणाचा प्रारंभ केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्हर्च्युअल पद्धतीने केला. मोपा विमानतळावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्लाय ९१ च्या पहिल्या विमान उड्डाणाला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटन मंत्री रोहन खवटे, खासदार सदानंद तानावडे, आमदार प्रवीण आर्लेकर यांनीही शुभेच्छा दिल्या.
मंत्री शिंदे म्हणाले की, ‘गोमंतकीयांनी पारतंत्र्याच्या काळात फार मोठा संघर्ष केला आहे. मला गोव्याबद्दल अभिमान वाटतो. आपलेपणा वाटतो. मुक्तीपूर्व गोव्यात माझे पुर्वज पोर्तुगीज सत्तेविरुद्ध लढले. मालोजी शिंदेंनी ३० वर्षे पोर्तुगीज सत्तेविरुद्ध संघर्ष केला. त्यांचा वारस म्हणून मला अभिमान वाटतो.’
प्लाय ९१ चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, मनोज चाको यांनी सांगितले की, ‘भारतातील सर्वात नवीन प्रवासी विमान कंपनी असलेल्या फ्लाय ९१ ने गोवा आणि लक्षद्वीप यांदरम्यानच्या विशेष उड्डाणाला सुरुवात केली आहे. १८ मार्चपासून मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून बेंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पहिल्या व्यावसायिक उड्डाणासह एअरलाइनच्या व्यावसायिक कामकाजला गती येईल. भारत अनबाउंडसाठी आमच्या व्हिजनचा एक भाग म्हणून हवाई प्रवास अधिक सुलभ बनवण्याच्या प्रयत्नात आज प्लाय ९१ने नवे पाउल उचलले आहे.
दरम्यान, प्लाय ९१ कडून लक्षद्वीप, पुणे, जळगाव आणि नांदेडसाठी उड्डाणे सर्वात प्रथम सुरू केली जातील. त्याची तयारी पुर्ण झाली असल्याचे कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले.