किशोरे कुबल
पणजी : सार्वजनिक गणेशोत्सव मुंबई, पुणे महानगरांपुरताच मर्यादित राहिला नसून गोव्यासारख्या छोट्या राज्यातही त्याचे लोण पसरले आहे. गोव्यात ठिकठिकाणी मिळून 200 हून अधिक सार्वजनिक गणपती पुजले जातात. या गणेशोत्सवात देणगी कुपनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. उत्तर गोव्यात 99 तर दक्षिण गोव्यात 102 सार्वजनिक गणपती असल्याची अधिकृत माहिती मिळते आहे. ही नोंदणीकृत सार्वजनिक मंडळे असली तरी प्रत्यक्षात आकडा यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे. कारण, अनेक मंडळांची नोंदणीही झालेली नाही.
लिंगभाट, पर्रा येथील सार्वजनिक गणेशोत्सव सर्वात जुना असून गेल्या 73 वर्षांची परंपरा या गणेशोत्सवाला आहे. यंदाचे 74 वे वर्ष असून पुढील वर्षी हा गणेशोत्सव हीरक महोत्सव साजरा करणार आहे. हा गणपती 21 दिवस असतो. म्हापशातील सार्वजनिक गणेशोत्सवही अत्यंत जुना होय. यंदाचे या गणेशोत्सवाचे 58 वे वर्षे होय. मडगांव येथील पिंपळकट्ट्यावरील गणेशोत्सव, वास्को, फोंड्यातील तसेच अन्य प्रमुख शहरांमधील सार्वजनिक गणेशोत्सवांमधून मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. पेडणे येथे बाजारात अवघ्या काही अंतरावर दोन ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जातात.
माशेलसारख्या छोट्या गावात आकर्षक देखाव्यांसाठी सार्वजनिक गणेशोत्सव प्रसिध्द आहे. 2001 साली साई कला मंडळाने नारळांपासून भव्य गणेशमूर्ती बनविली. ती एवढी गाजली की राज्यभरातून लोकांनी मुद्दाम ही मूर्ती पाहण्यासाठी गर्दी केली. त्यानंतर माशेल तसेच शेजारी खांडोळा, कुंभारजुवें आदी भागांमध्ये अशा आकर्षेक गणेशमूर्ती व देखावे बनविले जाऊ लागले. येथील कालाकार वेगवेगळ्या कलाकृतींची निर्मिती सातत्याने करीत आहेत. दरवर्षी माशेल, कुंभारजुवें, खांडोळा भागात 40 ते 45 मूर्ती भव्य स्वरुपात साकारल्या जातात.
देणगी कुपनांमधून कोट्यवधी रुपयांची उलाढालकेपें येथील सार्वजनिक गणेशोत्सव देणगी कुपनांसाठी प्रसिध्द आहे. या मंडळाची वार्षिक सुमारे अडीच कोटी रुपयांची उलाढाल होते. बक्षिसे म्हणून आलिशान महागड्या चारचाकी असतात. यावर्षी पहिले बक्षिस 18 लाख रुपये किमतीची इनोव्हा क्रिस्टा आणि 12 लाख रुपये रोख आहे तसेच अन्य दहा बक्षीसेही महागड्या मोटारी आणि रोख अशा स्वरुपात आहे. सार्वजनिक गणेशोत्सवांमधील चित्र बदलायला हवे, अशी प्रतिक्रिया काही भाविक व्यक्त करीत असतात. राज्यात मुक्तीनंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापन झाली. सुरवातीला पणजी, म्हापसा, मडगावसारख्या शहरांमध्ये अवघीच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे होती, गेल्या 40 ते 50 वर्षांच्या काळात या मंडळाची संख्या झपाट्याने वाढली. एखाद्या मंडळामध्ये धुसफुस झाली की लगेच नवीन मंडळाची स्थापना केली जाते. अनेक ठिकाणी असे दोन-दोन सार्वजनिक गणपती पहायला मिळतात.
राजधानी शहरात पणजीकर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती चर्च स्क्वेअर समोरील उद्यानात असतो. याशिवाय कदंब स्थानकावर, मारुतीगड सार्वजनिक गणपती मळा, विठ्ठल रखुमाई सार्वजनिक गणेशोत्सव, मळा, पणजी गणेश मंडळ, महालक्ष्मी मंदिर, यंग बॉयज ऑफ बोक द व्हाक, पणजी पोलिस स्थानक याठिकाणी सार्वजनिक गणपतींचे पूजन केले जाते. मडगांवमध्ये पिंपळकट्टा सार्वजनिक गणेशोत्सव, एसजीपीडीए मार्केट सार्वजनिक गणेशोत्सव, कोंब येथे राममंदिर सार्वजनिक गणेश मंडळ, टेलिफोन एक्सेंज गणेशोत्सव मंडळ आदी मंडळांचे सार्वजनिक गणपती आहेत. वास्कोतही अनेक सार्वजनिक मंडळे गणपती पुजतात.
पेडण्यात लोकमान्य सार्वजनिक मंडळ आणि पेडणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अशी दोन मंडळे आहेत. कळंगुट येथे शांतादुर्गा संस्थान सार्वजनिक मंडळाचा गणपती असतो. वेगवेगळ्या पोलिस स्थानकांवरही सार्वजनिक गणेश पुजले जातात. भाविक पोलिस स्थानकांमधील गणेशमूर्तींचे दर्शनही मनोभावे घेत असतात. सार्वजनिक गणेशोत्सवांव्यतिरिक्त प्रत्येक घरात दीड ते नऊ दिवसांचा गणपती असतो आणि या उत्सवाची तयारी साधारणपणे महिनाभर आधीपासून सुरू होते. सुमारे 65 हजार गणपती घराघरांमध्ये पुजले जातात.