वास्को: मुरगाव नगरपालिकेचा नगराध्यक्ष निवडण्यासाठी बुधवारी सकाळी पालिका सभागृहात बोलवण्यात आलेल्या बैठकीत नगरसेवक क्रितेश गावकर यांचा नगरसेवक निलेश नावेलकर यांच्याविरुद्ध १३ - १२ मताने नगराध्यक्ष पदावर विजय झाला. नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी (मंगळवारी) चार नगरसेवकांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरल्यानंतर निवडणूक बैठकीच्या वेळी नगरसेवक नंदादिप राऊत व फ्रेड्रीक्स हॅन्रीक यांनी आपले अर्ज मागे घेतल्यानंतर नगराध्यक्ष निवडण्यासाठी पालिकेतील नगरसेवकांनी मतदान केले. क्रितेश गावकर मुरगाव नगरपालिकेचे ५० वे नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले असून पालिकेच्या विकासासाठी व येथील लोकांच्या हीतासाठी आपण येणाऱ्या काळात अचुक पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बुधवारी सकाळी ११.३० वाजता पालिका सभागृहात नवीन नगराध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेला सुरवात करण्यात आली. मडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सिद्धीविनायक नाईक याप्रसंगी निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित असून त्यांच्याबरोबर सदर बैठकीला मुरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडीस उपस्थित होते. ५० नगराध्यक्ष निवडण्यासाठी पालिकेतील २५ सही नगरसेवकांनी उपस्थिती लावल्याचे दिसून आले. नगरसेवक क्रितेश गावकर, निलेश नावेलकर, नंदादीप राऊत व फ्रेड्रीक्स हॅन्रीक ह्या चार जणांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता. बैठक सुरू झाल्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी वेळ दिली असता नंदादीप व फ्रेड्रीक्स यांनी आपले अर्ज मागे घेतले. रिंगणात दोन उमेदवार असल्याने नंतर नगराध्यक्ष निवडण्यासाठी मतदान घेण्यात आले. यानंतर निर्वाचन अधिकारी नाईक यांनी मतमोजणी करून क्रितेश यांचा १३ विरुद्ध १२ मतानी विजय झाल्याची माहीती देऊन ते ह्या पालिकेचे ५० वे नगराध्यक्ष असल्याचे घोषित केले.
क्रितेश गावकर सत्ताधारी गटातील नगरसेवक असून त्यांना नगरविकासमंत्री मिलींद नाईक यांचा पाठींबा आहे. गावकर यांचा विजय झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपण पालिकेच्या विकासासाठी सर्व प्रकारची पावले उचलणार असल्याचे सांगितले. सत्ताधारी व विरोधी नगरसेवकात कुठल्याच प्रकारचा भेदभाव न करता आपण विकास करणार असल्याचे ते पुढे म्हणाले. मुरगाव नगरपालिकेच्या क्षेत्रात कच-याची समस्या काही प्रमाणात विविध कारणामुळे भेडसावत असून याबाबत त्यांना विचारले असता सदर समस्या सोडवण्यासाठी आपण नक्कीच पावले उचलणार असे ते म्हणाले. भावना नानोस्कर यांना सत्ताधारी गटाने नगराध्यक्ष म्हणून निवडल्यानंतर दोनच महीन्यात त्यांना ह्या पदावरून हटविल्याने मुरगाव पालिकेच्या नगराध्यक्ष पदाची खुर्ची पुन्हा संगीत खुर्ची बनणार अशी चर्चा असल्याने त्यांना हटवण्यामागे विविध कारणे होती असे गावकर यांनी सांगितले. आपण सत्ताधारी गटातील सर्व नगरसेवकांना एकत्र घेऊन चालणार असून विकास हाच आपला उद्देश असणार असल्याने नगराध्यक्ष पदाची खुर्ची आता स्थीर राहणार असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.