पणजी - गोव्यात बहुतांश गुन्हे परप्रांतीय मजूरच करतात, असा दावा करत गोव्यात येणाऱ्या मजुरांना लेबर कार्ड नोंदणी अनिवार्य व महत्त्वाची असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. कामगार दिनानिमित्त श्रमिक मित्र पुरस्कार वितरणाच्यावेळी ते बोलत होते.
सावंत म्हणाले की, बांधकाम मजुरांच्या बाबतीत कंत्राटदार, मालक, मजूर संघटनांचीही जबाबदारी आहे की, त्यांनी गोव्यात येणाऱ्या प्रत्येक मजुराला नोंदणी करायला लावून लेबर कार्ड घेणे. सरकारने लेबर कार्डांसाठी प्रक्रिया सुटसुटीत केली आहे. बांधकाम कामगार कल्याण निधीत ५०० कोटी रुपये निधी जमा झाला आहे. हा निधी मजुरांच्या कल्याणासाठीच वापरला जाईल. गोव्यात केवळ १० टक्के गोवेकर आणि ९० टक्के परप्रांतीय बांधकाम मजूर असले तरी निधीतील पैसा या मजुरांच्या कल्याणासाठीच खर्च केला जाईल. विनियोग कसा करावा, हा निर्णय बांधकाम मंडळ घेईल. सरकारने या वर्षी कामगार दिनाचा छोटेखानी कार्यक्रम केला असला तरी पुढील वर्षापासून राज्यस्तरावर मोठे आयोजन केले जाईल.
कामगारांना सोयी, सुविधा तसेच त्यांचे न्याय्य हक्क मिळायला हवेत, ही सरकारचीही भावना आहे. सरकारच्या विविध योजना कामगारांपर्यंत पोहोचायला हव्यात आणि त्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे, असेही त्यांनी सांगितले. कामगार नेते केशव प्रभू तसेच इतर संघटनांचे नेते याप्रसंगी उपस्थित होते.