पणजी : चार वर्षांपूर्वी घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी विनेश फळदेसाई (वय २९) आणि या बलात्कार प्रकरणात आरोपीला मदत करणाऱ्या पीडितेच्या मातेला (वय ३८) पणजी बाल न्यायालयाने दोषी ठरविले आहे. दोषी विनेश आणि त्याची प्रेयसी असलेली त्या मुलीची माता या दोघांनाही दोन जन्मठेपांचा दंड ठोठावण्यात आला आहे.कुंकळ्ळी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या या बलात्कार प्रकरणाचा खटला चार वर्षे बाल न्यायालयात सुरू होता. पब्लिक प्रॉसिक्युटर के. संझगिरी यांनी या खटल्याचा यशस्वी छडा लावताना आरोपींना दोषी सिद्ध करण्यास पुरेसे आणि भक्कम पुरावे न्यायालयात उभे केले. २०१० ते जानेवारी २०११ या काळात पीडितेवर विनेशने लैंगिक अत्याचार केले आणि तिच्या आईनेच त्याला साथ दिली, हे न्यायालयात सिद्ध करून दाखविले. पीडितेने व तिच्या १४ वर्षीय भावाने दिलेल्या साक्षी या प्रकरणात महत्त्वपूर्ण ठरल्या. आरोपी विनेशला भारतीय दंड संहिता कलम ३५४, ३७६ आणि गोवा बाल हक्क कायद्याच्या ८व्या कलमाअंतर्गत, तर पीडितेच्या आईला भारतीय दंड संहिता कलम १०९ आणि गोवा बाल हक्क कायद्याखाली दोषी ठरवून दंड सुनावण्यात आला.पीडित मुलीच्या वडिलांचे निधन झाले होते आणि ती दक्षिण गोव्यातील एका निवासी विद्यालयात शिकत होती. सुट्टीत घरी आली, तेव्हा विनेश तिच्या घरी राहायला आला होता. विनेश हा तिच्या आईचा प्रियकर होता आणि त्याचे घरी सतत येणे-जाणे होते. रात्रीही तो त्यांच्याच घरी झोपत असे. पीडित मुलगी झोपत होती, त्याच खोलीत विनेशही झोपत होता आणि याचीच संधी साधून तो मुलीवर अत्याचार करीत होता.आपल्या बहिणीचे रडणे ऐकून त्याच खोलीत झोपलेल्या तिच्या १४ वर्षीय भावाला जाग आली. विनेश तिच्यावर अत्याचार करीत असल्याचे त्याने पाहिले होते. विनेशसमोर बहिणीचा प्रतिकार तोकडा पडतानाही त्याने पाहिले होते. तो जेव्हा बहिणीच्या मदतीला धावून यायचा, तेव्हा त्यालाही धमकावून गप्प बसायला सांगितले जात होते. शेवटी एका बिगर सरकारी संस्थेच्या मदतीने या प्रकरणात विनेश आणि त्या मुलीच्या आईवर कुंकळ्ळी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आणि तेथूनच या प्रकरणाचा तपास सुरू झाला.
माता व तिच्या प्रियकराला दुहेरी जन्मठेप
By admin | Published: May 08, 2015 1:16 AM