लोकमत न्यूज नेटवर्क वास्को: कासावली येथे टिप्पर आणि चारचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. प्रियमवदा शर्मा (वय ५३, रा. बंगळुरू) असे तिचे नाव आहे. मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी शर्मा कुटुंब गोव्यात आले होते. मात्र, त्यांच्या आनंदावर काळाने झडप घातली. अपघातात महिलेचा मुलगा करण शर्मा (वय २५) व पती विनीत शर्मा (वय ५३) हे जखमी झाल्याची माहिती वेर्णा पोलिसांनी दिली.
घटनेनंतर टिप्पर चालक राकेश कुमार (वय १९) याने घटनास्थळावरून पोबारा काढला, मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी ४.२५ च्या सुमारास अपघाताची घटना घडली. बंगळुरू येथील प्रियमवदा या मुलगा करणचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बुधवारी पतीसह चारचाकीने कोलवा येथे जात होत्या. मात्र अचानक करण चारचाकी चालवताना वाट चुकला. वेर्णा येथे पोहोचल्यानंतर पुन्हा ते कासावलीच्या दिशेने जात होते. शर्मा कुटुंबियाची चारचाकी जेव्हा कासावली येथील थ्री कींग्स ओपन हॉल समोरील आली असता त्याचवेळी कासावली मार्केट ते वेर्णाच्या दिशेने भरधाव टिप्पर जात होता.
टिप्परने चुकीच्या बाजून येऊन चारचाकीला जबर धडक दिली. अपघात केल्यानंतर टीप्पर चालक राकेश कुमार (रा. वेर्णा, मूळ झारखंड) याने घटनास्थळावरून पळ काढला. अपघातात प्रियमवदा गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यासह मुलगा व पतीला उपचारासाठी गोमॅकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचार चालू असताना प्रियमवदा यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुरुवारी वेर्णा पोलिसांनी प्रियमवदा यांच्या मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला. वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक डायगो ग्राशियस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद गावकर अधिक तपास करित आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"