पणजी : घरी जाण्याची मुभा कायद्याने मिळत असताना सुधारगृहातून युवती पळून गेल्यामुळे या मुली पुन्हा वेश्या दलालांच्या जाळ्यात अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच त्यांच्या पळून जाण्यामागेही दलालांचाच हात असण्याचा संशय आहे. सुधारगृहातून पळून गेलेल्या सहा विदेशी युवती बुधवारीही सापडल्या नाहीत. त्यामुळे त्या गोव्यातून निसटल्याचे स्पष्ट होत आहे. या युवती सुधारगृहातून फिल्मी स्टाईलने सुटून जातात. कर्मचारी आणि पोलिसांना बांधून घालून पळ काढतात. पळालेल्या एकूण नऊपैकी केवळ तीन सापडतात. म्हणून शोभावा असा जरी असला तरी प्रत्यक्षात पचायला कठीण जाणारा असा आहे. या प्रकारामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ज्या सुधारगृहात २० च्या आसपास युवती ठेवल्या जातात त्या सुधारगृहात त्यांच्यावर देखरेखीसाठी केवळ एक महिला कर्मचारी आणि एक पोलीस अशी दोघांचीच सुरक्षा ठेवण्यामागे कारण काय. ही सुरक्षा अपुरी आहे, असे असतानाही अधिक मनुष्यबळासाठी प्रशासनाकडून प्रयत्न का केले नाहीत. पळालेल्या महिलांपैकी तिघी मिळतात त्यात एक बांगलादेशी तर दोन भारतीय आहेत; परंतु सहा विदेशी महिलाच का मिळू शकल्या नाहीत हे प्रश्न उपस्थित झाले आहेत. परिसरात दलालांचा वावर ज्या युवतींची सुटका करून सुधारगृहात ठेवले जाते त्यांना २१ दिवसांनंतर आपल्या घरी जाता येते. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यांच्या कुटुंबीयांकडून कुणी तरी त्यांचा ताबा घ्यावा लागतो. कुटुंबीयांनी त्यांना ताब्यात घेण्यापूर्वीच जेव्हा युवती बाहेर पळतात आणि पोलिसांना सापडत नाहीत, तेव्हा त्यांच्या मागावर असलेले दलाल त्यांना पुन्हा ताब्यात घेण्याची शक्यता आहे; कारण एकदा त्या कुटुंबीयांच्या हाती लागल्यास त्या पुन्हा आपल्याला मिळणार नाहीत अशी भीती दलालांना असते. अशा गोष्टी यापूर्वी घडलेल्याही आहेत, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिली. या युवती पुन्हा दलालांना मिळतात याचाच अर्थ दलालांचे लक्ष सुधारगृहावर कायम असते आणि सुधारगृहाच्या परिसरात त्यांचा वावरही असतो. (प्रतिनिधी).
सुधारगृहातून पळालेल्या युवती दलालांच्या जाळ्यात?
By admin | Published: August 25, 2016 3:23 AM