लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : काणकोण तालुक्यातील लोलये येथे फिल्मसिटी प्रकल्पासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. गोवा मनोरंजन सोसायटीकडून (इएसजी) भगवती पठारावर फिल्मसिटीसाठी लँड डेव्हलपर मिळविण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. फिल्मसिटीसाठी साधन सुविधा उभारण्यासाठीचे पहिले पाऊल म्हणजे यासाठीची जमीन विकसित करणे. त्यासाठी सक्षम डेव्हलपर शोधण्यासाठी सल्लागार गरजेचा आहे.
फिल्मसिटीसाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ट्रान्सेक्शन अॅडव्हायजरी सर्व्हिसेससाठी सल्लागाराची नेमणूक करण्यासाठी प्रक्रिया हाती घेण्यात आल्याची माहिती इएसजीच्या सूत्रांकडून देण्यात आली. भगवती देवस्थान पठारावर २५० एकर जागेवर फिल्मसिटी आणण्यास स्थानिक कोमुनिदाद संस्था उत्सुक असून त्यासाठी संस्थेने सरकारला अर्जही केला आहे. पठारावर फिल्मसिटीसाठी स्थानिक आमदार व विधानसभेचे सभापती रमेश तवडकर प्रयत्न करीत आहेत. काणकोणच्या शेजारील सांगे मतदारसंघाचे आमदार व मंत्री सुभष फळदेसाई यांनीही प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. फिल्मसिटीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा दोघांनीही केला आहे.
आयआयटी विरोधानंतर
यापूर्वी या पठारावर आयआयटी प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. परंतु येथील लोकांनी आयआयटीसाठी विरोध दर्शविला होता. आयआयटी प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर लोक गावात येऊन स्थायिक झाल्यास पायाभूत सुविधांची समस्या गंभीर होण्याची भीती लोकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे आयआयटी प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन झाले आणि सरकारला प्रकल्प गुंडाळावा लागला होता. या पार्श्वभूमीवर फिल्मसिटी प्रकल्पाबाबतीत स्थानिक काय भूमिका घेतात, यावरच या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे.
प्रकल्पाचा मार्ग खडतरच
अद्याप फिल्मसिटी प्रकल्पाच्या समर्थनासाठी किंवा विरोधात कोणीही जाहीरपणे प्रदर्शन करताना दिसत नसले तरी प्रकल्पाचा मार्ग सोपा नाही. या प्रकल्पावर गावात चर्चा होत आहे. बहुतेकांकडून विरोधाचाच सूर निघत आहे. त्यामुळे लोक प्रकल्पाला विरोध करण्याची आणि प्रसंगी आंदोलन करण्याची शक्यता अधिक आहे.
सल्लागारावर ही जबाबदारी
फिल्मसिटी विकसित करण्यासाठी व्यवहार सल्लागार सेवा पुरवणे तसेच फिल्मसिटीचा विकास करण्यासाठी सक्षम अशा खासगी कंपनीची निवड करणे आदी जबाबदारीही सल्लागाराची असेल. व्यवहार सल्लागार सेवा पुरवण्यासाठी सल्लागाराला दोन महिन्यांची मुदत असेल, तर त्यांना सोपवलेली संपूर्ण जबाबदारी पूर्ण करण्यासाठी चार महिने म्हणजे १२० दिवस सरकारने दिले आहेत. फिल्मसिटी उभारण्यासाठी जागा उपलब्ध करावी, अशी जाहिरात इएसजीने प्रसिद्ध केली. यात इच्छुक जमीन मालकांनी संपर्क साधावा, असे नमूद केले होते. त्यानंतर लालये कोमुनिदादने फिल्मसिटीसाठी २५० एकर जागा देण्याचा ठराव संमत केला होता. त्यानुसार सरकारने ही जागा निश्चित केली आहे. चित्रीकरण तसेच अन्य सुविधा फिल्म सिटीत असतील. राज्यात २००४ पासून इफ्फीचे आयोजन केले जाते. याशिवाय अनेक चित्रपटांचे चित्रीकरण सुद्धा केले जाते.