पणजी : गोव्यातील खनिज खाणींनी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केली आहे पण गोव्यातील पावसाचे प्रमाण पाहता येथील खाणींना सुरक्षेच्यादृष्टीने अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. काही सरकारी अधिका-यांनीही हे मान्य केले आहे. खाण खात्याच्या सचिव दौलतराव हवालदार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच गोव्यातील सचिवालयात एक बैठक झाली. त्यावेळी खाणींच्या सुरक्षेविषयी चर्चा करण्यात आली. गोव्यात खनिज खाण व्यवसाय सध्या 100 टक्के बंद आहे. खनिज लिजेस रद्द झालेली आहेत पण पावसाळ्य़ात खनिज खाणींचे डोंगर कोसळू नयेत म्हणून उपाययोजना करण्यास पूर्वीच्या लिजधारकांनाच सरकारने सांगितले होते. त्यानुसार उपाययोजना करण्यात आली आहे. मात्र गोव्यात अखंडीतपणो तीन-चार महिने पाऊस पडत असतो. यापूर्वीच्या काही वर्षात पावसाळ्य़ात खाणी कोसळण्यासारखे अपघात घडलेले आहेत. त्यामुळे खनिज खाणींनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
खाण सचिवांनी घेतलेल्या बैठकीत खाण खात्याचे संचालक प्रसन्ना आचार्य, जिल्हाधिकारी निला मोहनन, जलसंसाधन खात्याचे मुख्य अभियंते संदीप नाडकर्णी, इंडियन ब्युरो ऑफ माईन्सचे विभागीय नियंत्रक योगेश काळे, पोलीस अधिकारी उत्तम राऊत देसाई आदी सहभागी झाले होते. पावसाळ्य़ात विशेषत: खनिज खाणींनी उभे करून ठेवलेले डंप कोसळण्याच्या तसेच खनिज माती खाली गावांमध्ये किंवा नदी-नाल्यांमध्ये व शेतात वाहून येण्याच्या घटना घडतात. यामुळे पूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाने व मग खाण खात्याच्या अधिका-यांनी खनिज खाणींची पाहणी केली आहे. सुरक्षात्मक उपाय योजण्यात आले आहेत की नाही हे पाहिले आहे. 6 जून 2018 ते 13 जून 2018 ह्या कालावधीत ही पाहणी करण्यात आली. खाणींच्या सुरक्षेसाठी खाणींवर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
जलसंसाधन खातेही स्वतंत्रपणो खनिज खाणींवर लक्ष ठेवून आहे, अशी माहिती मुख्य अभियंते नाडकर्णी यांनी बैठकीत दिली. पाहणीवेळी गंभीर व नाजूक असे खंदक आणि डंप्स शोधून काढले जावेत, अशी इच्छा नाडकर्णी यांनी व्यक्त केली आहे. खनिज खाणींचे पाणी गावात जाऊ नये किंवा कुठेच पाणी तुंबून राहू नये म्हणून जलसंसाधन खाते काळजी घेत असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, गोव्यात जोरदार वृष्टी सुरू राहील असा इशारा हवामान खात्याने दिलेला असल्याने खनिज खाणींच्या सुरक्षेविषयी संबंधित कर्मचा:यांना अधिक सतर्क करावे असे बैठकीत ठरले आहे.