लोकमत न्यूज नेटवर्क कुडचडे : मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर आमदार नीलेश काब्राल यांनी प्रथमच आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 'माझ्याविरुद्ध खूप काही शिजले होते. केंद्रीय नेत्यांचेही कान भरले गेले', असा आरोप त्यांनी केले आहेत.
आपल्या मतदारांशी शनिवारी रात्री संवाद साधताना माजी मंत्री काब्राल यांनी आपल्याला राजीनामा का द्यावा लागला याचा पाढाच वाचला. काब्राल म्हणाले की, 'मी दिल्लीत पक्षाच्या केंद्रीय नेत्यांना भेटलो, तेव्हा माझ्याविरोधात बरेच काही शिजले होते. वरपर्यंत कान भरले गेले, याची जाणीव झाली. मंत्रिमंडळातून वगळण्यासाठी माझेच नाव का? असा प्रश्नही मी राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांना विचारला. जे काही चाललेय, ते मनाला पटत नाही, असेही स्पष्टपणे सांगितले.'
काब्राल म्हणाले की, 'राजीनामा देणे भाग आहे, असे सांगितल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; परंतु दुसऱ्याच दिवशी गुजरातला विश्वचषक स्पर्धा होती. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. शनिवारी, १८ रोजी रात्रीच मी मुलग्याला राजीनामा टाइप करायला सांगितला. दुसऱ्या दिवशी सकाळी ६:४५ वाजता दाबोळी विमानतळावर उतरून थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गाठून राजीनामा दिला.'
काब्राल म्हणाले की, 'कुडचडेचा विकास, युवकांच्या आकांक्षा पूर्ण करणे हेच माझे ध्येय आहे. कुडचडेत काही जण कोणाकोणाची नावे घेऊन पुढील उमेदवार आपणच या अविर्भावात आहेत. मला त्यांची पर्वा नाही. कुडचडेत जी काही विकासकामे बाकी आहेत, ती मतदारांच्या ताकदीवर सव्वातीन वर्षांच्या काळात मी पूर्ण करेन. यापुढेही निवडणूक लढवून लोकांचे प्रतिनिधित्व करीन.'
काब्राल म्हणाले की, 'मतदार ही माझी ताकद आहे. मी तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलो. त्यामुळे मंत्रिमंडळातून वगळण्यासाठी मीच का? असा प्रश्न पडला. काँग्रेसमधून फुटून आलेल्या आठ आमदारांपैकी एकाला मंत्रिपद द्यावे लागणार असल्याने मला राजीनामा द्यावा लागेल, असे सांगण्यात आले. बी. एल. संतोष यांचा फोन आल्यानंतर मी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांनाही भेटलो; परंतु माझ्याविरुद्ध बरेच काही शिजले होते, याची जाणीव प्रकर्षाने झाली.'
आणखी चार ते पाच मंत्र्यांचा राजीनामा ?
काब्राल म्हणाले की, 'सामाजिक जीवनात मला पदाची हाव नाही. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा आदर्श घेऊन मी पुढे जात आहे. पर्रीकर यांना मी कालही मानत होतो, आजही आणि उद्याही मानणार आहे. बी. एल. संतोष यांनी मला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल, असे सांगितले, तेव्हा मीच का? असा प्रश्न मी विचारला असता आणखी चार ते पाच मंत्र्यांना राजीनामा देण्याची तयारी ठेवा, असे सांगण्यात आले आहे, असे ते म्हणाले. बी. एल. संतोष यांनी फोनवरून मला राजीनामा द्यायला सांगितले होते; परंतु मी त्यांची प्रत्यक्ष भेट मागितली. मला जे काही सांगायचे होते, ते कोणताही मुलाहिजा न ठेवता त्यांना सांगितले.'