पणजी : नद्यांचे राष्ट्रीयीकरण हे गरजेचेच आहे. कारण राष्ट्रीयीकरणाद्वारेच हजारो कोटी रुपये खर्चुन राज्यातील सगळ्या महत्त्वाच्या नद्यांमधील गाळ उसपणे शक्य होईल, असे बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगून राष्ट्रीयीकरणाला पाठिंबा जाहीर केला.काही ग्रामसभा सध्या दबावाखाली येतात आणि नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाविरुद्ध ठराव घेतात. राष्ट्रीयीकरण झाले म्हणजे गोमंतकीयांची नद्यांवरील मालकी जात नाही. सध्या गोव्यात राष्ट्रीय महामार्ग आहेत पण महामार्गाशी संबंधित सगळी कामे गोवा सरकारच करत असते. महामार्गाप्रमाणोच नद्यांचे असेल. राष्ट्रीयीकरणाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. जे लोक कोकण रेल्वेला आणि मोपा विमानतळाला विरोध करत होते, तेच आता नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला विरोध करत आहेत, असे मंत्री ढवळीकर म्हणाले.मच्छीमारांना काही जण चिथावणी देत आहेत. साळ व अन्य नद्या प्रदूषित झालेल्या आहेत. त्यात खूप गाळ साठलेला आहे. केंद्र सरकारकडून निधी घेऊन हा गाळ काढावा लागेल. नद्या साफ कराव्या लागतील, असे मंत्री ढवळीकर म्हणाले. नद्यांमधील गाळ काढला गेला तर त्याचा लाभ मच्छीमारांनाच होईल, असाही दावा ढवळीकर यांनी केला.भारतमालासाठी 7 हजार कोटीकेंद्र सरकार भारतमाला प्रकल्पासाठी सात हजार कोटी रुपये गोव्यात खर्च करणार आहे. आम्ही भारतमाला प्रकल्प राबवणार आहोत. त्याचा लाभ गोव्यातील नद्यांना आणि पर्यटन स्थळांनाही मिळेल. आम्ही भारतमाला प्रकल्प अंमलात आणताना लोकांना विश्वासात घेणार आहोत. लोकांची घरे पाडली जाणार नाहीत याची काळजी घेऊ, असे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले. नद्यांमधील गाळ उसपण्याचा प्रस्ताव सर्व प्रथम केंद्रात काँग्रेसचे सरकार असतानाच आला होता. आपण तेव्हा गोव्यातील काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारमध्ये मंत्री होतो. मी या विषयाबाबत त्यावेळीच त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. विरोध होईल म्हणून त्यावेळी आम्ही हा प्रस्ताव मार्गी लावला नव्हता, असे मंत्री ढवळीकर म्हणाले. सारमानस, बाणस्तारी फेरीबोट अनेकदा रुतत असते. केरी-तेरेखोलला देखील तसेच होते. नद्या उसपून मार्ग जर व्यवस्थित केले गेले तर नद्यांमधील वाहतूक चांगली होईल. नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाचे आम्ही स्वागत करतो, असे ढवळीकर यांनी सांगितले.
नद्यांच्या राष्ट्रीयीकरणास मगोपचा पाठिंबा जाहीर, नद्यांमधील गाळ उसपणे गरजेचेच : सुदिन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 8:05 PM