म्हापसा : येथील एसबीआय बँकेच्या लेनमध्ये पूर्ववैमन्यासातून झालेल्या वादाचे पर्यावसन खूनात झाले. संशयिताने डोक्यात दंडुका मारल्याने एका हमाल तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. १४) दुपारी १ वाजता घडली असून म्हापसा पोलिसांनी ताबडतोब घटनेच्या तासाभरात संशयितास म्हापसा बाजारपेठमधून ताब्यात घेऊन नंतर रितसर अटक केली.राहुल बंगाली (३२, पश्चिम बंगाल) असे मयताचे नाव आहे. तर पिंताबर मलीक (३५, ओडिसा) असे संशयिताचे नाव आहे.म्हापसा पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित व मयत हे दोघेही परप्रांतीय असून ते म्हापसा बाजारपेठेत हमालीचे काम करायचे. संशयित पिंताबर व मयत राहूल यांचे पूर्ववैमन्यस होते. बुधवारी दुपारी मयत हा एका महिलेसोबत एसबीआय बँकेच्या लेनमध्ये फूटपाथवरील खुल्या जागेत जेवण करायला बसले होते. त्यावेळी संशयित पिंताबर हा घटनास्थळी आला व त्याने मयत राहूलशी वाद उरकून काढला. काही वेळानंतर तो निघून गेला व पुन्हा त्याठिकाणी दडुंक्यासह आला. तो दडुंका त्याने राहूल याच्या डोक्यावर व महिलेच्या हातावर मारला. यात राहूलचा जागीच मृत्यू झाला, तर महिलेच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली.या घटनेची माहिती स्थानिकांनी म्हापसा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी जखमी महिलेला १०८ रुग्णवाहिकेतून जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. तर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठविला. यावेळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचरण केलेले. यावेळी पोलीस उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई, पोलीस विजयकुमार चोडणकर, उपनिरीक्षकअनिल पोळेकर, उपनिरीक्षक आशिष परब व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
म्हापशात भरदिवसा हमालाचा खून; संशयिताला केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 7:40 PM