पणजी : अवयवदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी ‘दि फेडरेशन आॅफ आॅर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन’ आणि स्नेहबंधन या संघटनांनी संयुक्तपणे आयोजित केलेली मुंबई-गोवा पदयात्रा मंगळवारी पनवेल येथे पोचली. येत्या १५ एप्रिल रोजी मडगांव येथे या पदयात्रेची सांगता होणार आहे.
पदयात्रेचे गोवा समन्वयक एम. एस. राव यांनी दिलेल्या माहितीनुसार परेल येथील केईएम रुग्णालयाजवळ २३ रोजी या पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. अवयवदान कार्यकर्ता सुनील देशपांडे यांच्यासह १५ ते २0 ज्येष्ठ नागरिक या पदयात्रेत सहभागी झाले असून वाटेत त्या त्या ठिकाणचे डॉक्टर्स अवयवदानाबाबत लोकांना मार्गदर्शन करतील. या मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा व ग्रामीण रुग्णालये, खाजगी रुग्णालये यांना सदर उपक्रमास सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.
मुंबई-गोवा मार्गावरील किनारपट्टीतील गावांमध्येही ही पदयात्रा जाणार असून एकूण ८६0 किलोमिटरचा पायी प्रवास करणार आहे. एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या किंवा शाळेच्या आवारात लोकांना सीडी, व्हिडियो चित्रफिती दाखवून अवयवदानाबाबत जागृती केली जाईल. इंडियन मेडिकल असोसिएशन, केईएम इस्पितळाचे डीन, ‘रोटो’ आदी संघटनांनी पदयात्रेला पाठिंबा दिलेला आहे.
राव म्हणाले की, लोकांना केवळ मरणोत्तर नेत्रदानाबद्दलच माहीत आहे. हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड एवढेच नव्हे तर त्वचाही दान करता येते याबाबत तेवढी जागृती लोकांमध्ये झालेली नाही. ऐरोलीसारख्या ठिकाणी डॉ. केशवानी यांच्या इस्पितळात अनेक रुग्ण येतात जे आगित होरपळल्याने गंभीर जखमी झालेले असतात. अशा रुग्णांना त्त्वचेची गरज असते. डोळे व त्त्वचा दोन ते तीन वर्षे प्रयोगशाळेमध्ये संवर्धित करुन ठेवता येते परंतु मूत्रपिंड, हृदय यांच्या रोपणाबाबत मर्यादा आहेत. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही तासांच्या आतच ते काढून गरजू रुग्णावर रोपण करावे लागते. मध्यंतरी चेन्नई येथून हृदय आणून मुंबईतील एका गरजू रुग्णावर त्याचे यशस्वीरित्या रोपण करण्यात आले त्यामुळे त्याला जीवदान मिळाले.
राव म्हणाले की, गोव्यात दरवर्षी सुमारे ३ हजार रस्ता अपघात घडतात. गेल्या वर्षी ३८0 जण अपघातात ठार झाले. अशा व्यक्तींच्या अवयवांचे गरुजू रुग्णांवर रोपण झाल्यास गरजूंचे प्राण वाचतील. अवयवदानाबाबत लोकांमध्ये अनेक चुकीचे समज आहेत. मात्र ७0 वर्षे वयापर्यंत कोणीही व्यक्ती अवयवदान करु शकते.
गोव्यात आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर काही विषय आपण ठेवणार आहे, असे राव यांनी सांगितले. गोव्यात पदयात्रेच्यावेळी मणिपाल इस्पितळाचे तसेच गोमेकॉचे डॉक्टर्सही लोकांना अवयवदानाबाबत मार्गदर्शन करतील, असे त्यांनी सांगितले.