पणजी : माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या मिरामार येथे होऊ घातलेल्या स्मारकाचे मुंबईच्या उत्तम जैन आर्किटेक्टने तयार केलेले डिझाइन स्वीकारण्यात आले आहे. सुमारे १0 कोटी रुपये खर्चुन हे स्मारक बांधण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समितीसमोर पाच कंपन्यांनी मंगळवारी नियोजित स्मारकाच्या डिझाइनबाबत सादरीकरण केले. या समितीत सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर, साधन सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, आर्किटेक्टचर कॉलेजचे प्राचार्य तसेच साधन सुविधा विकास महामंडळाचे सरव्यवस्थापक संदीप चोडणेकर हे सदस्य आहेत.
भाऊसाहेबांच्या समाधीचे डिझाइनही त्यांचेच
पाच कंपन्या सादरीकरणासाठी पात्र ठरल्या होत्या. त्यातील दोन कंपन्या राहुल देशपांडे अॅण्ड असोसिएटस तसेच आर्किटेक्टर कमलाकर साधले या दोन कंपन्या गोमंतकीय होत्या. मुंबईच्या मेहुल शहा तसेच उत्तम जैन आर्किटेक्टस व दिल्लीच्या एका कंपनीनेही सादरीकरणात भाग घेतला. अखेर उत्तम जैन आर्कि टेक्टने तयार केलेले डिझाइन निवडण्यात आले. योगायोग म्हणजे मिरामार येथे गोव्याचे भाग्यविधाते पहिले मुख्यमंत्री दिवंगत भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीचे डिझाइनही त्यावेळी उत्तम जैन यांनी तयार केले होते. भाऊसाहेबांच्या समाधी शेजारीच आता पर्रीकर यांचे स्मारक येणार आहे.
ध्यानधारणेसाठी विशेष व्यवस्था!
या स्मारकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला व्यापक संकुलाचे स्वरुप असेल. ध्यानधारणा करण्यासाठी विशेष व्यवस्था केली जाईल. याशिवाय पर्रीकर यांच्या कारकिर्दिची सुरवातीपासूनची समग्र माहिती देणारे फोटो प्रदर्शन असेल तसेच दृक श्राव्य माध्यमातूनही त्यांच्या कार्याची माहिती दिली जाईल, असे माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येंकर सांगितले.