पणजी : गोव्यात पोर्तुगीज काळापासून पावसाळी बेगमीसाठी चालत आलेल्या 'पुरुमेंताच्या फेस्ता'वर यावर्षी लॉकडाऊनमुळे गदा आली, परंतु राजधानी शहरात महापालिका मात्र शहर आणि परिसरातील लोकांना पावसाळी बेगमीसाठी दरवर्षीप्रमाणे कडधान्ये व इतर गोष्टींचा साठा करता यावा याकरिता पुढे सरसावली आहे.पणजी शहरात उद्या रविवारपासून पुढील आठ दिवस ' पुरुमेंताचचे फेस्त' होणार असून पन्नास-साठ स्थानिक शेतकरी अळसांदे, आमसुले, कुळीथ, सुकी मासळी आदी वस्तू घेऊन विक्रीसाठी बसणार आहेत. महापौर उदय मडकईकर यांनी पत्रकार परिषदेत आज ही माहिती देताना सांगितले की, दीड-दोन महिने पणजी आणि परिसरातील शेतकरी आपले उत्पादन विकू शकले नाहीत. त्यांच्या उदरनिर्वाहाची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
शहरातील मार्केट इमारतीतील विक्रेत्यांसाठी आम्ही आयनॉक्समागे भाजीपाला विक्रीची सोय केली. 'पुरुमेंताचें फेस्त' मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चार दिवस पणजी शहरात भरत असे. आठ ते दहा विक्रेते कडधान्य तसेच सुकी मासळी घेऊन विक्रीला बसत, परंतु यंदा लॉकडाऊनमुळे मे महिन्याचा पहिला आठवडा कोरडा गेला. स्थानिक विक्रेते, शेतकऱ्यांच्या मनात जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीबाबत चिंतेचे वातावरण होते तसेच ग्राहकांमध्येही, खास करून गृहिणींमध्ये आपल्याला यावर्षी पावसाळी बेगमी कशी करता येईल, ही चिंता होती.
स्थानिक शेतकऱ्यांची ससेहोलपट आणि गृहिणींची चिंता ओळखून आम्ही चार दिवसांऐवजी आठ दिवस हे फेस्त करण्याचे योजिले आहे. उद्यापासून आठ दिवस विक्रेते कडधान्ये व इतर वस्तू 'सोशल डिस्टन्स' चे सर्व नियम आम्ही सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून करणार आहोत. प्रत्येक विक्रेत्याला दीड मीटरच्या अंतरावर बसविले जाईल. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका राहणार नाही.
महापौर मडकईकर पुढे म्हणाले की, ' राजधानीतील मार्केट इमारत आम्ही बऱ्याच दिवसांनी खुली केली. परंतु तेथे मोबाईल रिपेरिंग व दुरुस्तीचे दुकाने थाटून बसलेल्या काही दुकानदारांनी आगळीक केली. महापालिकेने पान - मसाला खाण्यावर तसेच गुटखा यावर निर्बंध घातले असताना गुटखा- पान मसाला खाऊन इमारतीच्या भिंती रंगविल्या. यामुळे मोबाईल विक्री आणि दुरुस्तीची ५० दुकाने आम्ही बंद केली आहे. या दुकानदारांना त्यांच्या खर्चाने मार्केट धुऊन साफ करण्यास सांगितले आहे तसेच गाळ्यांच्या मालकीविषयी आवश्यक ते दस्तऐवज सादर करण्यास सांगितले आहे. पानमसाला गुटखा खाऊन भिंतीवर रंगविणाय्रा थुंकी बहाद्दरांची आम्ही गय करणार नाही महापालिका याबाबत पुढेही कडक धोरण अवलंबणार आहे. त्यामुळे आमच्याशी कोणी खेळू नये,असा सज्जड इशाराही महापौर मडकईकर यांनी दिला आहे.