वास्को : दक्षिण गोव्यातील मुरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी बुधवारी (दि.२६) सकाळी बोलवलेल्या बैठकीच्या ऐनवेळी निर्वाचन अधिकारी सिद्धीविनायक नाईक यांनी आजारी असल्याचा संदेश देऊन बैठकीस अनुपस्थित राहील्याने सदर बैठक रद्द करावी लागली. निर्वाचन अधिकारी सिद्धीविनायक नाईक राजकीय दबावाखाली येऊन त्यांने खोटे नाटक करून बैठकीस अनुपस्थित राहील्याचा आरोप मुरगाव पालिकेतील काही नगरसेवकांनी करून त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मुरगाव नगरपालिकेच्या पूर्वीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांवर अविश्वास ठराव संमत केल्यानंतर मागच्या एका महीन्यापासून पालिकेतील दोन्ही पदांच्या खुर्च्या रिक्त आहेत. मुरगाव पालिकेचे नवीन नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी पालिका संचालकांनी २६ जून चा दिवस यापूर्वी निश्चित करून ह्या बैठकीला मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धीविनायक नाईक निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित राहणार असल्याचे ठरवले होते. मंगळवारी (दि.२५) मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी आठ नगरसेवकांनी अर्ज दाखल केला होता. नगरसेवक नंदादीप राऊत, यतीन कामुर्लेकर, सैफुल्ला खान व रोचना बोरकर यांनी नगराध्यक्षपदासाठी तर रिमा सोनुर्लेकर, श्रीधर म्हार्दोळकर, लीयो रॉड्रीगीस व मुरारी बांदेकर यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी आपला अर्ज दाखल केला होता. बुधवारी ११.३० वाजता नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूक बैठकीला नगरसेवक उपस्थित झाले. सदर बैठक सुरू करण्यासाठी निर्वाचन अधिकाऱ्यांची वाट पाहत येत असताना त्यांच्या मोबाईलवरून मुरगावचे मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांना फोन आला. मुख्याधिकाऱ्यांनी तो घेतला असता आपण सिद्धीविनायक नाईक यांचा नातेवाईक बोलत असून त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात नेण्यात आल्याची माहीती देऊन यामुळे ते निवडणूक बैठकीला येणार नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर सदर बैठक निर्वाचन अधिकाºयांच्या अनुपस्थितीत घेणे शक्य नसल्याने ती रद्द करण्यात आली.
बुधवारी होणार असलेल्या ह्या निवडणूक बैठकीत वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांचे समर्थन असलेले नगरसेवक नंदादीप राऊत यांची नगराध्यक्ष पदावर तर रिमा सोनुर्लेकर यांची उपनगराध्यक्ष पदावर निवड होणार होती अशी चर्चा मागील दिवसापासून सुरू होती. निर्वाचन अधिकारी सिद्धीविनायक नाईक यांच्या अनुपस्थितीमुळे बैठक रद्द झाल्याने नंदादीप राऊत व रिमा सोनुर्लेकर यांना समर्थन असलेल्या नगरसेवकांनी याबाबत संताप व्यक्त केला. मुरगाव नगरपालिकेतील नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष पदाची ही निवडणूक वास्कोचे भाजप आमदार कार्लुस आल्मेदा यांचे समर्थन असलेले नगरसेवक व नगरविकासमंत्री तथा भाजपचे आमदार मिलींद नाईक यांचे समर्थन असलेल्या नगरसेवकांच्या विरुद्ध होणार असल्याचे स्पष्ट चित्र असून सिद्धीविनायक नाईक ह्या बैठकीला राजकीय दबावाखाली येऊन जाणून बुजून आलेले नसल्याचा आरोप आमदार कार्लुस समर्थक नगरसेवकांनी केला आहे. सिद्धीविनायक नाईक काही आजारी झालेले नसून त्यांनी मुद्दामहून खोटे नाटक करून बैठकीला अनुपस्थित राहीले असल्याचा आरोप नगरसेवक दिपक नाईक, निलेश नावेलकर व अन्य काही नगरसेवकांनी केला. मागच्या एका महीन्यापासून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची खुर्ची रिक्त असून यामुळे पालिका क्षेत्रातील अनेक जनहीताची कामे लटकून राहीलेली असून स्वताच्या स्वार्थासाठी अशा प्रकारचे राजकारण करणे चुकीचे असल्याचे नगरसेवक बोलताना म्हणाले. बुधवारी वास्कोत पडलेल्या मुसळधार पावसात अनेक ठीकाणी रस्त्यावर पाणी तुंबणे, घरात पाणी शिरणे इत्यादी सारख्या घटना घडलेल्या असून नगराध्यक्षांच्या अनुपस्थितीमुळे विविध मान्सूनपूर्व कामे राहून गेल्याचा आरोप नगरसेवक दिपक नाईक व इतरांनी केला. निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले सिद्धीविनायक नाईक मुद्दामहून नाटक करून बैठकीला अनुपस्थित राहीले असल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची गरज असल्याची मागणी नगरसेवकांनी केली.आमदार कार्लुस आल्मेदा व त्यांचे समर्थन असलेल्या नगरसेवकांनी गोमॅकॉ इस्पितळात घेतली धावनिर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले सिद्धीविनायक नाईक यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना गोमॅकॉ इस्पितळात नेण्यात आल्याची माहीती समोर येताच हे केवढे सत्य आहे ते जाणून घेण्यासाठी वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा व त्यांचे समर्थन असलेल्या नगरसेवकांनी गोमॅकॉ इस्पितळात धाव घेतली. सदर इस्पितळात माहीती काढण्यात आली असता ११ वाजता सिद्धीविनायक नाईक स्वता येथे येऊन आपली तपासणी करून नंतर घरी गेल्याचे समजताच आमदार आल्मेदा व नगरसेवकांनी याबाबत संताप व्यक्त केला. सिद्धीविनायक नाईक यांने जाणून बुजून नाटक करून तो बैठकीला अनुपस्थित राहीला असल्याचा संशय आमदार आल्मेदा यांनी याप्रसंगी व्यक्त करून त्याला निलंबित करण्याची गरज असल्याचे म्हणाले. अशा प्रकारे राजकारण करून निवडणूक न घेणे एकदम चुकीची गोष्ट आहे. मागच्या एका महीन्यापासून मुरगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष नसल्याने जनहीताची विविध कामे रखडलेली असून स्वताच्या फायद्यासाठी अशा प्रकारचे राजकारण करणे एकदम चुकीचे असल्याचे कार्लुस आल्मेदा पुढे बोलताना म्हणाले. गोव्याचे नगरविकासमंत्री मिलींद नाईक यांनी ह्या प्रकरणात दखल घेऊन पावले उचलून मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष लवकरात लवकर निवडण्यासाठी पावले उचलण्याची गरज असल्याचे कार्लुस आल्मेदा शेवटी म्हणाले.निवडणूक बैठक न घेणे चुकीचा प्रकार: कॉग्रेस आमदार आलेक्स रेजीनाल्डनिवडणूक लोकशाहीचा एक मोठा भाग असून निर्वाचन अधिकारी उपस्थित राहीले नसल्याने ती रद्द करणे हा प्रकार चुकीचा असल्याची प्रतिक्रीया आमदार आलेक्स रेजीनाल्ड यांनी प्रत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. काही कारणामुळे निर्वाचन अधिकारी अनुपस्थित राहीले तर त्याजागी दुसरा अधिकारी नियुक्त करून मुरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक घेणे गरजेचे होते, मात्र तसे न झाल्याने चुकीची गोष्ट घडलेली आहे. ११ वाजता स्वता निर्वाचन अधिकारी सिद्धीविनायक नाईक गोमॅकॉ इस्पितळात आल्यानंतर त्यांनी आपली तपासणी करून नंतर ते येथून निघून गेल्याने मुरगाव नगरपालिकेच्या निवडणूक बैठकीला जाणून बुजून अनुपस्थित राहण्यासाठी त्यांनी हे नाटक रचले असावे असा संशय आमदार रेजीनाल्ड यांनी याप्रसंगी व्यक्त केला. नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष मुरगाव नगरपालिकेत सध्या नसल्याने वास्कोतील लोकांना विविध समस्या सोसाव्या लागत असून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ह्या प्रकरणात दखल देऊन उचित पावले उचलणे गरजेचे असल्याचे रेजीनाल्ड शेवटी म्हणाले.