पणजी : आॅक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या पालिका निवडणुका पक्षीय पातळीवर नको, अशी भूमिका भाजपच्या बहुतांश आमदारांनी रविवारी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, आमदार यांच्या संयुक्त बैठकीत मांडली. अलीकडेच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत हात पोळून घेतल्याने भाजप आमदारांनी हा पवित्रा घेतला. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत प्रादेशिक आराखड्याचाही विषय आला. आराखड्याच्या प्रश्नावर सात-आठ आमदारांची उपसमितीही निवडण्यात आली. पर्वरी येथे एका खासगी हॉटेलात झालेल्या बैठकीत पक्षाच्या आमदारांनी वेगवेगळ्या विषयांवर म्हणणे मांडले. आमदार विष्णू वाघ, सुभाष फळदेसाई, प्रमोद सावंत व इतरांनी मुद्दे प्रभावीपणे मांडले. प्रादेशिक आराखड्याअभावी लोकांची बांधकामे अडली आहेत, तर दुसरीकडे स्वैर बांधकामांच्याही तक्रारी वाढत चालल्या आहेत, त्यामुळे आराखडा लवकरात लवकर होणे आवश्यक असल्याचे मत अनेकांनी मांडले. लोबो, कांदोळकर अनुपस्थित मगोबरोबरची युती संपुष्टात आणावी तसेच मगोचे मंत्री सुदिन ढवळीकर व दीपक ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून वगळावे आणि भाजप आमदारांची वर्णी लावावी, या मागणीसाठी आमदारांचा एक दबावगट मध्यंतरी तयार झाला होता; परंतु या बैठकीत मगोचा विषय आलाच नाही. आमदार मायकल लोबो, किरण कांदोळकर व सभापती राजेंद्र आर्लेकर बैठकीला अनुपस्थित राहिले. तिघेही विदेशात आहेत. दरम्यान, भाजपचे महालोकसंपर्क अभियान १ मे पासून सुरू झालेले असून ४ लाख सदस्यांना घरोघरी भेटण्याची मोहीम याच आठवड्यात हाती घेतली जाईल. या मोहिमेच्या पूर्वतयारीची चर्चाही बैठकीत करण्यात आली. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आरंभ गोव्यात होणार आहे. पहिला कार्यक्रम येत्या ९ रोजी पणजीत होईल. वाघांकडून मरिनाचा विषय सांत आंद्रेचे आमदार विष्णू वाघ यांच्याशी या प्रतिनिधीने संपर्क साधला असता, बांबोळी मरिनाचा विषय उपस्थित केल्याचे ते म्हणाले. लोकांना मरिना नको असेल तर त्यावर फेरविचार करू, असे आश्वासन आपल्याला दिल्याचे त्यांनी सांगितले. पालिका निवडणूक पक्षीय पातळीवर नको, असे आपलेही मत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पालिका निवडणुका पक्ष पातळीवर नको
By admin | Published: May 04, 2015 1:22 AM