वास्को - १७ आॅक्टोबरला मुरगाव नगरपालिकेचा नवीन नगराध्यक्ष निवडण्यासाठी बोलवलेल्या बैठकीत ज्याचा विजय होणार तो नगराध्यक्ष मुरगाव नगरपालिकेचा ५० वा नगराध्यक्ष म्हणून त्याचे नाव इतिहासात नोंद होणार आहे. भावना नानोस्कर यांना मुरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावरून हटविल्यानंतर बुधवारी नवीन नगराध्यक्ष निवडण्याची बैठक होणार असल्याने सत्ताधारी गटाबरोबरच विरोधी गटही सध्या आपल्या पॅनलातील नगरसेवकाला नगराध्यक्ष बनवण्यासाठी विविध प्रकारच्या राजकीय हालचाची करत आहेत. सध्याच्या राजकीय हालचाली पाहता सत्ताधारी गटातील नगरसेवक क्रितेश गावकर यांच्या गळ््यात ५० व्या नगराध्यक्षाची माळ पडण्याची शक्यता वाढलेली असली तरी १७ आॅक्टोंबरला नगराध्यक्ष निवडणूक झाल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.दोन महीन्यापूर्वी सत्ताधारी गटाने भावना नानोस्कर यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून आणल्यानंतर त्यांच्यात व सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांचे बिनसल्याने त्यांनी नानोस्कर यांच्यावर अविश्वास ठराव आणला. १२ आॅक्टोंबरला याबाबत निर्णय घेण्यासाठी बैठक घेतली असता हा ठराव तिच्या विरुद्ध १३ मतांनी संमत झाला. भावना यांना नगराध्यक्ष पदावरून हटविल्यानंतर रिक्त असलेली ही जागा भरून काढण्यासाठी १७ आॅक्टोंबरला पालिका सभागृहात बैठक बोलवण्यात आली आहे. नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्यासाठी १५ आॅक्टोंबरचा दिवस (सोमवार) निश्चित केला आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील कोण कोण नगरसेवक उमेदवारी अर्ज भरणार, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी गटाला नगरविकासमंत्री मिलींद नाईक यांचा पाठींबा असून ह्याच गटाची बाजू बळकट असल्याची चर्चा असून ह्याच गटाच्या नगरसेवकाच्या गळ््यात नगराध्यक्ष पदाची माळ पडणार असे दिसून येत आहे. अविश्वास ठराव संमत होण्यापूर्वी ह्या गटातील नगरसेवक क्रितेश गावकर यांच्याबरोबरच मुरारी बांदेकर याचे नाव नगराध्यक्ष पदाच्या दावेदारीसाठी चर्चेत होते. अविश्वास ठराव संमत होऊन आता नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी तारीख जाहीर करण्यात आल्यानंतर सत्ताधारी गटातून फक्त क्रितेश गावकर यांचे नाव नगराध्यक्षासाठी ह्या गटातून दावेदारीसाठी येत असून बहुतेक तेच ह्या पालिकेचे ५० वे नगराध्यक्ष बनणार अशी चर्चा सध्या होत आहे. क्रितेश नगरविकासमंत्री मिलींद यांचे जवळीक असण्याबरोबरच त्यांनी यापूर्वी नगराध्यक्ष पद सांभाळल्याने आहे. नगराध्यक्ष पद कशा प्रकारे सांभाळावे याचा त्यांना अनुभव असल्याने सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी त्यालाच नगराध्यक्ष बनवण्यासाठी एकंदरीत मान्यता दिल्याची माहीती सूत्रांनी दिली.दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी सत्ताधारी गट बळकट असला तरी तो फक्त एक जास्त मताने पुढे असून सत्ताधारीच्या बाजूत १३ तर विरोध नगरसेवकाच्या बाजूत १२ नगरसेवक असल्याचे सध्याचे चित्र आहे. विरोधी गटातील नगरसेवकांना वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांचा पाठींबा असून १७ आॅक्टोंबर पूर्वी होणार असलेल्या विविध राजकीय उलाढालीतून बाजी उलटूही शकते अशी चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. विरोधी गटातील नगरसेवकातून नगराध्यक्ष पदासाठी पूर्वी कार्लुस आल्मेदा यांचा पाठींबा असलेला नगरसेवक फ्रेड्रीक्स हँन्रीक नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा होती, मात्र यात आता भर पडलेली असून माजी नगराध्यक्ष दिपक नाईक यांचेही नाव चर्चेत येत आहे.
सत्ताधारी तसेच विरोधी नगरसेवकांच्या गटात नगराध्यक्ष निवडणूकीसाठी चांगली चुरस होणार हे निश्चित असून दोन्ही गटांना आपल्या नगरसेवकांमध्ये ‘कोंप्रमाईझ’ करून फक्त ह्या पदासाठी एक - एकच उमेदवार उतरवण्याची गरज असल्याने याबाबत दोन्ही गटात राजकीय पातळीवर विविध दृष्टीने चर्चा चालू आहेत. एका गटातील नगरसेवक दुसऱ्या गटात जाऊ शकतो अशी भितीही दोन्ही गटात असल्याने आपला पूर्ण ‘पॅनल’ सांभाळून ठेवण्यासाठी दोन्ही गट सर्व प्रकारची पावले उचलत असल्याचे सूत्रांनी कळविले. नगराध्यक्ष पदाच्या ह्या निवडणूकीला ‘व्हीटामिन एम’ चा सुद्धा वापर करण्याची शक्यता निर्माण झाल्याने मुरगावचा ५० वा नगराध्यक्ष कोण हे १७ आॅक्टोंबरलाच स्पष्ट होणार आहे.