लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यात गुरुवारी सकाळी मान्सूनपूर्व सरींच्या झालेल्या आगमनामुळे धगधगत्या ग्रीष्माच्या दाहातून गोमंतकीयांना दिलासा मिळाला. त्यामुळे मान्सूनही लवकरच दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सकाळी पावणेसातच्या सुमारास सुरू झालेला पाऊस जवळपास दीड ते पावणेदोन तास कोसळत होता.
या पावसाने मुरगाव व सासष्टी तालुक्याला झोडपून काढले. अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. मात्र जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार ४ जून रोजी मान्सून केरळात दाखल झाल्यास ८ ते ९ जूनपर्यंत तो गोव्यातही दाखल होण्याची शक्यता आहे.
गुरुवारी सकाळ झाली ती पावसाच्या ढगांनी झाकलेले आकाश घेऊन. सकाळी सासष्टी तालुक्यात मडगाव परिसर आणि मुरगाव तालुक्यात वास्कोसह परिसरात जोरदार पाऊस पडला. सासष्टीत इतर ठिकाणीही पाऊस कोसळला. तिसवाडी तालुक्यात आजोशी, मुंडर आणि करमळी भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. बार्देश तालुक्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याचे सांगण्यात आले. दिवसभर पावसाची रिमझिम होण्याची शक्यताही हवामान खाते वर्तवली आहे. पणजी दिवसभर हवामान ढगाळ होते. मात्र, पाऊस झाला नाही.
आटत चाललेली राज्यातील धरणे आणि अनेक ठिकाणच्या सुकलेल्या विहिरी यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होताना दिसत आहे. त्यातच मान्सून लांबणीवर पडण्याच्या हवामान खात्याच्या अंदाजामुळे चिंता आणखी वाढली होती; परंतु मान्सूनपूर्व सरी दाखल झाल्यामुळे आता मान्सूनही फार लांब नाही हा दिलासा मिळाला आहे.
पहिल्याच पावसात मडगाव पालिका इमारत पाण्याखाली
शहरात बुधवारी मध्यरात्री व पहाटेपासून संततधार तीन तास पडलेल्या पूर्वमोसमी पावसात मडगाव पालिकेची इमारत पाण्याखाली गेली. पालिका चौकातील काहीं दुकानांत पाणी आत शिरून व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. पालिकेकडून पावसाळापूर्व कामे व्यवस्थित पूर्ण झालेली नसून चौकातील गटारे योग्य प्रकारे उपसण्यात आली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या पावसाने पालिका इमारतीभोवताली पूरस्थिती निर्माण झाली. शहरात बुधवारी रात्री १० वाजल्यापासून वारे वाहण्यास सुरूवात झाली होती. त्यानंतर पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळण्यास सुरूवात झाली. गुरुवारी पहाटे ६ वाजल्यापासून जोरदार सरी कोसळल्या.
गटारे तुंबून पालिका चौकात पूरस्थिती
वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह तीन तास पावसाच्या संततधार सरी कोसळल्याने गटारे तुंबून पालिका चौकात पूरस्थिती निर्माण झाली. दरम्यान, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी पालिकेच्या कामगारांना बोलावून घेवून तुंबलेल्या गटरांच्या वाटा खुल्या करून पावसाच्या पाण्याला वाट मोकळी करून दिली.
त्यांनी पालिका क्षेत्रातील विविध प्रभागांना भेटी देऊन स्थितीचा आढावा घेतला. एक-दोन ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली होती. तिथे वेळीच कामगारांना पाठवून रस्त्यावरील अडथळे दूर केले, अशी माहिती देण्यात आली.
दुकानांचे नुकसान
हंगामी पालिका चौकातील कोहिनूर ऑप्टिशियन्सच्या मालकीचे कोहिनूर हार्डव्हेअर दुकान, मोळीये फार्मासी व त्याच चाळीत असलेल्या काही दुकानात गटारे तुंबून पाणी शिरल्याने दुकानदारांचे बरेच नुकसान झाले आहे
मान्सून पुन्हा सक्रिय
- श्रीलंकेजवळ भारतीय महासागरात दाखल झालेला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून तो अरबी समुद्रातून वळसा घेऊन वेगाने केरळ किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे.
- भारतीय हवामान खात्याने वर्तविलेले अंदाज सार्थ ठरण्याचे पूर्ण संकेत असून विलंब झाला तरी जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून केरळ किनारपट्टीवर थडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- कारण मान्सूनच्या आगमनाची पूर्व सूचना देणाच्या पूर्व मान्सूनच्या सरी गोव्यापर्यंत पोहोचल्या आहेत. भारतीय हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेनेही याची पुष्टी केली.
पावसाळ्यात दरवर्षी पहिल्याच पावसात गटारांच्या वाटा कचऱ्याने बंद होऊन पावसाचे पाणी अडून राहते. आज पालिका चौकात पाणी तुंबून पूरस्थिती निर्माण झाल्याची दखल पालिकेने घेतली आहे. पूरस्थितीची स्वतः पाहणी करुन पावसाच्या पाण्याला वाट करून देण्याचे काम पालिकेने युद्धपातळीवर सुरु केले आहे. - दामोदर शिरोडकर, नगराध्यक्ष, मडगाव पालिका