पणजी : तब्बल २0३७ विदेशी पर्यटकांना घेऊन एमव्ही सेलेब्रिटी कॉन्स्टेलेशन हे महाकाय क्रुझ लायनर जहाज रविवारी मुरगाव बंदरात दाखल झाले आहे. या जहाजावर ९७५ खलाशी व कर्मचारी आहेत. मुरगाव बंदरात पाचव्यांदा हे जहाज आलेले आहे. या मोसमात आतापर्यंत एकूण १९ क्रुझ लायनर जहाजे या बंदरात आली. पर्यटन विकास महामंडळाच्या अधिका-यांनी एमव्ही सेलेब्रिटी कॉन्स्टेलेशनवरील पाहुण्यांचे स्वागत केले. प्राप्त माहितीनुसार या जहाजातून आलेल्या विदेशी पर्यटकांमध्ये ग्रेट ब्रिटनचे ९८५, आॅस्ट्रियाचे २३0, इंडोनेशियाचे १७२ तर मूळ भारतीय परंतु विदेशात स्थायिक असलेल्या १७४ जणांचा समावेश आहे. ई-लँडिंगची सुविधा देऊन या सर्व पर्यटकांच्या इमिग्रेशनचे सोपस्कार तात्काळ पार पाडण्यात आले.मुरगाव बंदराच्या क्रुझ टर्मिनलवर १0 इमिग्रेशन कक्ष कार्यरत आहेत. पाहुण्यांनी नंतर गोव्यातील पुरातन मंदिरे, चर्च, किनारे आदी पर्यटनस्थळांना भेट दिली. आज सायंकाळीच हे जहाज मुंबईकडे प्रयाण करणार आहे. चालू महिन्यात आणखी पाच मोठी क्रुझ लायनर जहाजे विदेशी पर्यटकांना घेऊन मुरगाव बंदरात येणार आहेत. राज्यातील पर्यटन व्यवसायासाठी क्रुझ लायनर जहाजे फायदेशीर ठरत आहेत. अधिकृत सरकारी आकडेवारीनुसार दरवर्षी सुमारे ३0 लाख देशी व १0 लाख विदेशी पर्यटक गोव्याला भेट देतात. विदेशी पाहुण्यांची साधारणपणे मार्च अखेरपर्यंत वर्दळ असते त्यानंतर एप्रिल-मे महिन्यात देशी पर्यटक गोव्याच्या पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी करीत असतात.
एमव्ही सेलेब्रिटी कॉन्स्टेलेशन क्रुझ लायनर जहाज मुरगाव बंदरात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2018 8:10 PM