पणजी : गाजलेल्या कथित सेक्स स्कॅण्डल प्रकरणानंतर वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी आरोप केला की, माझा आवाज क्लोन करून बनावट ॲाडिओ क्लिप तयार करण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. एक एनजीओने तसेच पोलिस अधिकाऱ्यांनी मला याबाबत सतर्क केले असून, या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करण्याची गरज आहे.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा अ. भा. काँग्रेस कार्यकारिणीवरील कायम निमंत्रित गिरीश चोडणकर यांनी कथित सेक्स स्कॅण्डल उघडकीस आणल्यानंतर मंत्री माविन यांच्या कार्यालयातून पोलिस तक्रार करण्यात आली होती. त्यात मंत्री माविन यांची प्रतिमा मलीन करण्यासाठीच हा सर्व प्रकार चालू असल्याचे म्हटले होते.
माविन म्हणाले की, मुळात जी गोष्ट घडलेलीच नाही ती घडली आहे, असा दावा करणे संतापजनक आहे. मला कळत नाही किती खालच्या स्तरावर जाऊन दुसऱ्याची अप्रतिष्ठा केली जात आहे. राजकीय हेतूने बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे. गेली ४५ वर्षे मी राजकारणात आहे, असे आरोप कधीच झाले नाहीत. या वयात मला लक्ष्य केले जात आहे.
मुख्यमंत्र्यांना भेटणारमला मुळापासून चौकशी हवीय. ते वृत्त कोणी तयार केले. कोणाचे संबंध आहेत, हे पोलिसांनी शोधावे. ज्याच्याविरुध्द तक्रार केली आहे, संशय व्यक्त केला त्याला पोलिसांनी चौकशीसाठी आणावे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटून चौकशीला गती देण्याची मागणी करणार आहे.
क्लिपसाठी धडपडमाझा आवाज क्लोन करुन बोगस ॲाडिओ क्लिप तयार करण्याचा प्रयत्न आता चालू आहे. एका टेक्निशियनने हे करण्यास नकार दिल्यावर विरोधकांनी दुसऱ्याला गाठले असून, त्याने क्लिप तयार करण्याची तयारी दाखविल्याची माहिती मला मिळाली आहे.