पणजी: शेअरबाजारात झटपट फायदा करून देणाऱ्या स्टॉक्सवर पैसे गुंतवून मोठी रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेणाऱ्या सासस्टीमधील पतीपत्नीविरुद्ध गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाकडून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या दांपत्याने ३० जणांकडून एकूण २०.८३ कोटी रुपये गुंतवणुकीसाठी घेऊन नंतर फसवणूक केल्याची तक्रार गुंतवणूकदारांनी केली होती.
संशयितांचे नाव मेरॉन रॉड्रिगीश आणि त्याची पत्नी दीपाली परब असे आहे. स्वत:ची शेअरमार्केट मधील ब्रोकर अशी ओळख त्यांनी गुंतवणूकदारांना करून दिली. तसेच झटपट फायदा मिळवून देणाऱ्या शेअर्समध्ये पैसे गुंतवून भरमसाट फायदा मिळवून देण्याचे आमिष त्यांनी गुंतवणूकदारांना दाखविले होते. संशयितांनी तक्रारदारांना २५ ते ४५ टक्के व्याज देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार, संशयितांनी तक्रारदारांना २० डिसेंबर २०११ ते १५ जुलै २०२३ या कालावधीत २० कोटी ८३ लाख ९० हजार ३३६ रुपये गुंतवणूक करण्यात आली होती. गुंतवणूकदारांकडून पैसे धनादेश, एनएफटी व इतर स्वरूपातून रक्कम त्याने घेतली होती. संशयितांनी ते पैसे शेअर्समार्केटमध्ये गुंतवून गमावले की न गुंतवताच हडप केले या बद्दल अद्याप काहीच निष्पन्न झालेले नाही. परंतु आपली फसवणूक केल्याचा गुंतवणूकदारांचा दावा आहे. या प्रकरणात पोलीस तपास करीत असून लवकरच सत्य उघडकीस येईल असे पोलीस सांगतात.