साखळी : फणसवाडी-न्हावेली या मार्गावर खाण वाहतूकदारांच्या मनमानी कारभारामुळे विविध समस्यांनी त्रस्त स्थानिक लोकांनी बुधवारी सकाळी फणसवाडी रस्त्यावर खाण वाहतूक रोखून धरली. गावातील पुरुष व महिला रस्त्यावर आल्याने या भागात तणाव निर्माण झाला. वाहतुकीची कोंडी झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. येथील आमदार तथा सभापती डॉ. प्रमोद सावंत, डिचोलीचे संयुक्त मामलेदार प्रवीण गावस, पोलीस निरीक्षक नारायण चिमुलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. मात्र, समस्या सोडविल्याशिवाय खाण वाहतूक सुरू करण्यास ग्रामस्थांनी नकार दिला. फणसवाडी प्रगती मंच व फणसवाडी ग्रामस्थांच्या वतीने स्थानिक पंच करुणा महाले, माजी सरपंच रोहिदास कानसेकर यांच्या नेतृत्वाखाली हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी फणसवाडी रस्त्यावरील खाण वाहतूक रोखून धरली. तसेच वाहतूकदारांची कागदपत्रे ताब्यात घेतली. त्यामुळे सकाळपासून या रस्त्यावर एकच गोंधळ उडाला. रस्ता बंद झाल्यामुळे इतर वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली. सभापती सावंत, संयुक्त मामलेदार गावस व निरीक्षक चिमुलकर यांनी फणसवाडी भागात भेट देऊन स्थितीची पाहणी केली व ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांना ग्रामस्थांनी मागण्यांचे लेखी निवेदन दिले. फणसवाडी भागात सुमारे शंभर घरे आहेत. त्यांच्यासाठी हा एकमेव रस्ता आहे आणि तोसुद्धा दहा खाण कंपन्यांच्या बेसुमार ट्रक रहदारीमुळे व्यापून जातो. नागरिकांना रस्त्यावर येणेसुद्धा मुश्किल झाले असल्याचे पंच करुणा महाले यांनी सांगितले. खाण कंपनीला निवेदन देऊनही दखल घेतली जात नसल्याने बुधवारी वाहतूक रोखण्याचा मार्ग अवलंबल्याचे त्या म्हणाल्या. फणसवाडीच्या जनतेने कायदा हातात न घेता शांततेत समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन संयुक्त मामलेदार गावस यांनी केले. समस्या सोडविण्याचे आश्वासनही संयुक्त मामलेदार प्रवीण गावस यांनी दिले. (लो. प्र.)
न्हावेलीत खाण वाहतूक रोखली
By admin | Published: April 06, 2017 1:47 AM