पणजी : सरोगसीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीला सक्तीचे शारीरिक संबंध लावण्यास भाग पाडण्याच्या प्रकरणात पणजी महिला पोलिसांनी चार जणांना अटक केली. वास्को येथील या घटनेत वयाचा बोगस दाखला देऊन अल्पवयीन मुलीला १९ वर्षे वयाची असे सांगून सरोगसीसाठी करार करण्यात आल्याचेही उघड झाले आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे सत्यवान नाईक, तस्लीमा हाजीम, शोहेब आफ्रिदी, सलाथ आफ्रिदी अशी आहेत. यापैकी सत्यवान नाईक याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचे आणि फरार असलेल्या मोतीराम गावकर यानेही बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पणजी महिला पोलिसांनी दोघांवरही बलात्काराचे गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्यावर फसवणूक, कारस्थान आणि मानवी तस्करीचा गुन्हाही नोंदविण्यात आला आहे. शोहेब आफ्रिदी आणि सलाथ आफ्रिदी हे मूळ बिहार येथील जोडपे असून ते वास्कोला राहत आहे. त्यांनी सरोगेट मातृत्वासाठी पीडितेला ठेऊन घेतले होते. पीडित मुलगी ही मूळ कर्नाटकमधील असून वास्को येथे राहत होती. अटक करण्यात आलेली तस्लीमा हिने या जोडप्याबरोबर या मुलीसाठी करार केला होता. या कराराअंतर्गत तिला दीड लाख रुपये देण्यात आले होते असा मुलीने दावा केला आहे. सरोगसीवर बंदी नसली तरी मुलगी अल्पवयीन असल्यामुळे हा गुन्हा ठरत आहे. ती अल्पवयीन नसल्याचे दाखविण्याकरीता कर्नाटकातून त्या मुलीचा बोगस जन्मदाखला मिळविण्यात आला होता. करार करताना आफ्रिदी जोडपे आणि तस्लीमा उपस्थित असल्यामुळे तिघांनाही अटक करण्यात आली आहे. परंतु पीडितेचा जन्मदाखला हा बोगस आहे, हे आपल्याला ठाऊक नसल्याचे आफ्रिदी जोडप्याचे म्हणणे आहे.
एक जण फरार...या प्रकरणात पीडित मुलीने एका बिगर सरकारी संस्थेच्या मदतीने गुन्हा नोंद केल्यानंतर महिला पोलिसांनी तातडीने कारवाई करून तिघांना अटक केली, परंतु या प्रकरणातील मुख्य संशयित असलेला मोतीराम गावकर फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मोतीराम आणि सत्यवानने पीडितेला तस्लीमाकडे नेले होते. दरम्यान, शनिवारी सत्यावानला न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.