पणजी- मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. गोवा विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची नावं आघाडीवर आहेत. भाजपाला नव्या मुख्यमंत्र्यांसंदर्भात विचारणा केली असता, अजून त्यावर निर्णय झाला नसल्याचं सांगितलं आहे. आमचं लक्ष सध्या मनोहर पर्रीकर यांच्या अंत्यसंस्कारावर आहे. या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेते गोव्यात येणार आहेत. तसेच मुख्यमंत्रिपदासंदर्भातील निर्णय बैठकीत घेऊ, असंही भाजपाच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांसंदर्भात सत्ताधारी भाजपा आणि मित्र पक्षांच्या आमदारांमध्ये बैठकीचं सत्र सुरूच आहे. याचदरम्यान गोवा विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. भाजपा आणि गोवा फॉरवर्ड पार्टी यांनी प्रमोद सावंत यांच्या नावाला पसंती दिल्याची चर्चा आहे. परंतु महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षानं अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. तसेच प्रमोद सावंत हे पर्रीकरांचेही अत्यंत विश्वासू होते. पर्रीकरांना एखाद्या सरकारी कार्यक्रमाला जाणं शक्य नसल्यास ते प्रमोद सावंत यांना पाठवत असत. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचंही नाव चर्चेत आहे. श्रीपाद नाईक हे भाजपाकडून उत्तर गोवा मतदारसंघातून 13व्या, 14व्या, 15व्या आणि 16व्या लोकसभेत निवडून गेले. श्रीपाद नाईक हे केंद्रात मंत्री असून, त्यांच्याकडे आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला आहे. या दोन नावांवर सध्या भाजपा आणि मित्र पक्षांमध्ये खल सुरू आहे. त्यामुळे कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडते, हे येत्या काळात समजणार आहे.
गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी प्रमोद सावंत, श्रीपाद नाईक यांची नावं आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 11:29 AM