वास्को: मुरगाव नगरपालिकेचा नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी आज (दि.४) बोलवण्यात आलेल्या बैठकीत नगरसेवक नंदादीप राऊत यांची नगराध्यक्षपदी तर नगरसेविका रिमा सोनुर्लेकर यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली. सदर निवडणूक मतदानाद्वारे घेण्यात आली असता नगरसेवक नंदादीप राऊत यांना नगराध्यक्ष पदासाठी १४ तर सैफुल्ला खान यांना ११ मते मिळाली असून उपनगराध्यक्ष पदासाठी रिमा सोनुर्लेकर यांना १४ व मुरारी बांदेकर यांना ११ मते मिळाली.मुरगाव नगरपालिकेचा नवीन नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी आज सकाळी ११.३० वाजता पालिका सभागृहात बैठक बोलवण्यात आली होती. ह्या बैठकीला पालिका संचालक डॉ. तारीक थोमस यांनी निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थिती लावली असून मुरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांचीही उपस्थिती होती. मुरगाव नगरपालिकेतील २५ सही नगरसेवक ह्या बैठकीत उपस्थित होते. बैठकीला सुरवात झाल्यानंतर निर्वाचन अधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेले अर्ज मागे घेण्यासाठी वेळ दिला असता नगरसेवक यतीन कामुर्लेकर व रोचना बोरकर यांनी नगराध्यक्ष पदाचा अर्ज मागे घेतला तर श्रीधर म्हार्दोळकर व लीयो रॉड्रीगीस यांनी उपनगराध्यक्ष पदाचा अर्ज मागे घेतला. यानंतर नगराध्यक्ष पदासाठी नंदादीप राऊत व सैफुल्ला खान तर उपनगराध्यक्ष पदासाठी रिमा सोनुर्लेकर व मुरारी बांदेकर यांचे अर्ज राहील्याने ह्या पदांची निवड करण्यासाठी मतदान घेण्याचे ठरवण्यात आले.नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष ह्या दोन्ही पदांची निवडणूक घेण्यात आल्यानंतर मतांची मोजणी केली असता नंदादीप राऊत यांना १४ तर सैफुल्ला खान यांना ११ मते मिळाल्याने नंदादीप राऊत यांची नगराध्यक्ष पदावर निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच रिमा सोनुर्लेकर यांना १४ तर मुरारी बांदेकर यांना ११ मते मिळाल्याने निर्वाचन अधिकारी तारीक थोमस यांनी रिमा यांची उपनगराध्यक्ष पदी निवड झाल्याचे घोषीत केले. नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले दोन्ही नगरसेवक वास्कोचे भाजप आमदार कार्लुस आल्मेदा यांचे समर्थक असून ह्या निवडणूकीत नगरविकासमंत्री मिलींद नाईक (भाजपचे आमदार) यांचा पाठींबा असलेल्या गटाला पराभव पत्कारावा लागल्याचे दिसून आले.नंदादीप राऊत मुरगाव नगरपालिकेचे ५१ वे नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले असून निवडणूकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुरगाव नगरपालिकेच्या विकासासाठी आपण सर्व प्रकारची पावले उचलणार असल्याचे सांगितले. मुरगाव बंदरात हाताळण्यात येणा-या कोळशामुळे वास्को तसेच जवळपासच्या भागातील नागरीकांना प्रदूषणाचा त्रास सोसावा लागत असल्याचे मागच्या अनेक काळापासून दिसून आले असून कोळसा प्रदूषण पूर्णपणे रोखण्यासाठी कडक पावले उचलण्यात येणार असे ते म्हणाले.कोळसा वाहतूक करताना होणारे प्रदूषण रोखण्यासाठी काय कडक पावले उचलण्यात यावी याबाबत योग्य विचार करून तशी पावले उचलण्यात येणार असल्याचे नंदादीप यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. सत्ताधारी विरोधी नगरसेवक अशा प्रकारचा कुठलाच भेदभाव न करता मुरगाव नगरपालिकेतील सर्व प्रभागांच्या विकासासाठी आपण काम करणार असल्याची माहीती नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी याप्रसंगी शेवटी दिली. उपनगराध्यक्ष रिमा सोनुर्लेकर यांनी पत्रकारांशी बोलताना नगराध्यक्ष नंदादीप राऊत व आपण मिळून मुरगाव नगरपालिकेच्या विकासासाठी काम करणार असल्याचे सांगितले.
मुरगाव नगरपालिकेच्या ५१ व्या नगराध्यक्षपदी नंदादीप राऊत यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 3:24 PM