- सद्गुरू पाटील, पणजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोमंतकीयांसमोर रोजगार संधी व भ्रष्टाचाराविषयी खोटे बोलले. गोव्यातील भाजपा सरकार ५० हजार रोजगाराच्या संधी निर्माणच करू शकले नाही. भाजपा सरकारच्या काळात किनारपट्टी स्वच्छता कंत्राटात भ्रष्टाचार झाला, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी सोमवारी म्हापसा येथील प्रचारसभेत केली.राहुल यांच्या सभेला लक्षणीय गर्दी होती. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ४ फेब्रुवारीला मतदान होत आहे. काँग्रेस गोव्यात चाळीसपैकी ३७ जागा लढवित आहेत. गोमंतकीय मतदारांसमोर आम्ही नवे आणि युवा चेहरे दिले आहेत. गोव्यात आता काँग्रेसचे सरकार येईल आणि ते भ्रष्टाचारापासून मुक्त असेल. हे युवा सरकार असेल. लोकांना व काँग्रेस कार्यकर्त्यांना मंत्री व मुख्यमंत्र्यांची दारे सदैव खुली असतील, असे त्यांनी सांगितले.पंतप्रधान मोदी हे स्वत:च्या मनातील ‘बात’ लोकांना ऐकवतात; पण देशातील एकाही माणसाच्या मनातील ‘बात’ त्यांना ऐकावीशी वाटत नाही. ते कुणाचेच काही ऐकत नाहीत. आजपर्यंत एकाही माणसाला जवळ बोलावून मोदी यांनी तुझ्या मनात काय आहे ते मला सांग, असे म्हटलेले नाही. भाजपा व संघाची पद्धतच अशी आहे. भाजपाच्या नेत्यांना वाटते, की त्यांना सगळेच काही कळते. त्यामुळे ते दुसऱ्यांचे ऐकत नाहीत, असाही टोला त्यांनी लगावला. काही दिवसांपूर्वी माझी बहीण प्रियांका हिला विमानात एक भाजपा नेते भेटले. ते नेते प्रियांकाशी बोलले; पण त्यांच्या मनात कसला तरी मोठा राग होता. प्रियांका मला म्हणाली, की भाजपच्या नेत्यांना संपूर्ण जगावरच कसला तरी राग असल्यासारखे वाटते. ते कायम रागात असतात, असेही त्यांनी सांगितले.