पणजी - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गोव्यात भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंग, स्मृती इराणी, नितीन गडकरी आदी येतील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एप्रिलच्या दुस:या आठवडय़ात गोव्यात सभा होण्याची शक्यता आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आमदार निलेश काब्राल यांच्या उपस्थितीत बोलताना तेंडुलकर म्हणाले, की पंतप्रधानांना आम्ही एप्रिलमध्ये गोव्यात निमंत्रित केले आहे. एप्रिलच्या दुस:या आठवडय़ात त्यांनी गोव्यात यावे अशी विनंती केली आहे. पंतप्रधान त्यांच्या सवडीनुसार आम्हाला त्यांचा निर्णय कळवतील व त्यानुसार तारीख निश्चित होईल. अन्य अनेक केंद्रीय नेते गोव्यात येऊन प्रचार करतील. भाजपचे विद्यमान दोन खासदार हेच उत्तर व दक्षिण गोव्यासाठी भाजपचे उमेदवार आहेत. श्रीपाद नाईक यांनी प्रियोळ मतदारसंघातील मंदिरात नारळ ठेवून प्रचारालाही गुरुवारी आरंभ केला, असे तेंडुलकर यांनी सांगितले. येत्या 18 रोजी भाजपच्या केंद्रीय निवड समितीची दिल्लीत बैठक होईल व त्यावेळी उमेदवार अधिकृतरित्या जाहीर केले जातील.
खाण अवलंबित आमचेच
खनिज खाण अवलंबितांविषयी बोलताना आमदार काब्राल म्हणाले, की खाण अवलंबित हे कायम भाजपला मत देत आले आहेत. यावेळीही ते भाजपलाच मत देतील. कनसेशन्स रद्दच्या कायद्याविषयी ज्या याचिका सर्वोच्च न्यायालयात आहेत, त्या लवकर सुनावणीसाठी घ्याव्यात अशी विनंती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. आमच्यासाठी हे स्वागतार्ह आहे. अगोदर न्यायालयाने त्या याचिकांविषयी काय ते ठरवू द्या मग गोव्यातील खनिज खाणी सुरू करण्याविषयी केंद्र सरकार काय ती भूमिका घेईल. केंद्राने आता पाऊल तरी उचलले आहे व ते महत्त्वाचे आहे.