लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : ढवळीकर बंधूवर निशाणा साधत माजी आमदार नरेश सावळ यांनी मगोपला रामराम ठोकला आहे. पक्षाच्या कार्यकारी समिती अध्यक्षपदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत त्यांनी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचेही काल जाहीर केले आहे.
उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. मात्र पक्ष अजून ठरलेला नाही. कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेईन, असे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. मगोप सोडताना सावळ यांनी ढवळीकर बंधूना लक्ष्य केले. हे कथित नेते लहान लोकांकडे दुर्लक्ष करतात. डिचोली मतदारसंघ तसेच उत्तर गोव्यातील लोकांना त्याचा त्रास झालेला आहे. पक्षाचे नेते लोकांना किंमत देत नाहीत, असे ते म्हणाले.
राजीनामापत्रात ते म्हणतात की, पक्ष संघटन कार्य करून दाखवण्याच्या बाबतीत अपयशी ठरला आहे आणि त्यामुळे लोकांचा या पक्षावरील विश्वास उडाला आहे. सावळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन मी पुढील कृती जाहीर करीन.
दरम्यान, याबाबत पक्षाचे ज्येष्ठ नेते वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, एक चांगला कार्यकर्ता पक्ष सोडून गेला याचे वाईट वाटले. सावळ यांना जर दुसऱ्या पक्षात त्यांचे भवितव्य वाटत असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. सावळ यांच्याविषयी मला नेहमीच आदर आहे.'
पक्षाचे काम ठप्प, हे मान्य : ढवळीकर
ढवळीकर बंधू पक्ष पुढे नेण्यात अपयशी ठरल्याची जी टीका सावळ यांनी केली आहे, त्याबद्दल विचारले असता सुदिन म्हणाले की, पक्षाचे काम ठप्प झालेले आहे. याबद्दल मला काहीच बोलायचे नाही. केवळ ढवळीकर बंधू पक्ष पुढे नेऊ शकत नाहीत. त्यासाठी सर्वांनी एकत्रपणे काम करायला हवे.
सावळ यांनी राजीनामा देणे हे धक्कादायक आहे. ते दहा वर्षापासून मगोपचे काम करीत होते. मगोपने आजवर नेहमीच लहान लोकांना सांभाळले म्हणूनच दहा ते बारा टक्के मते मगोपकडे टिकून राहिली. पक्षाने कधीही लहान लोकांवर अन्याय केलेला नाही. - दीपक ढवळीकर, अध्यक्ष, मगोप