- संदीप आडनाईकपणजी : भारत सरकारच्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'दशक्रिया' हा चित्रपट शुक्रवारी गोव्यात सुरु असलेल्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग असलेल्या फिल्म बाजारमध्ये दाखविण्यात आला, असे असले तरीही या चित्रपटाच्या मागे लागलेली साडेसाती अजूनही संपलेली नाही, असेच दिसते. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांना इफ्फीमध्ये थेट प्रवेश देण्याची परंपराही यावर्षी खंडित झालेली आहे. कासवसोबतच राष्ट्रीय पुरस्कार मिळविणा-या 'दशक्रिया'ला इफ्फीमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे चित्रपट निवड समितीवर न्यूडनंतर पुन्हा एकदा या चित्रपटावरुन सुरु असलेला वाद अजूनही श्मलेला नाही. दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप पाटील यांना आजही जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.दशक्रिया २०१७ मधील ६४ वा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट आहे. लेखक बाबा भांड यांच्या १९९४ मध्ये प्रकाशित झालेल्या 'दशक्रिया' या कादंबरीवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप पाटील यांनी केले आहे. दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. हिंदू धमार्तील दशक्रिया विधीची परंपरा व त्या अनुषंगाने अनेक जून्या बाबींवर या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे. २0१६ मध्ये या चित्रपटाला सेन्सॉरचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.'दशक्रिया' सोबतच राष्ट्रीय पुरस्कार मिळविणा-या कासव या चित्रपटाला इफ्फीमध्ये थेट प्रवेश देण्यात आला. भारत सरकारच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाने ९ मराठी चित्रपटांची निवड केली. तर सहा चित्रपट राज्य सरकारकडून निवडण्यात आले. मात्र, इफ्फीकडून दशक्रियाचा समावेश करण्यात आला, नसल्याची खंत संदीप पाटील यांनी व्यक्त केली.
समाजाच्या विरोधी चित्रण या चित्रपटात केल्याचा आरोप करणा-या ब्राम्हण समाजाने या चित्रपटाला विरोध केला आहे, तर संभाजी ब्रिगेड या संघटनेने दशक्रिया चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या या चित्रपटाबद्दलच्या वादात आणखी भर पडली आहे. दिग्दर्शक संदीप पाटील यांचा हा चित्रपट शुक्रवारी फिल्म बाजारमध्ये दाखविण्यात आला. तत्पूर्वी त्यांना जीवे मारण्याची आणि चित्रपटातील समाजाच्या गैरचित्रणासंबंधी धमकी देणारा फोन आल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले. मात्र, आता अशा धमक्यांची आपल्याला सवय झाल्याचे ते म्हणाले.न्यायालयाच्या निर्णयानंतर हा चित्रपट १७ नोव्हेंबर २0१७ मध्ये प्रदर्शित करण्यात आला. तत्पूर्वी पुणे, औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबतच गोवा मनोरंजन सोसायटीच्या मराठी चित्रपट महोत्सवातही या चित्रपटाला पुरस्कार मिळालेला आहे. २0१६ मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला उत्कृष्ट दिग्दर्शन आणि उत्कृष्ट बालकलाकार असे दोन पुरस्कार मिळाले आहेत.- या चित्रपटाला होणारा विरोध अनाकलनीय आहे. १९९४ मध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरीचा हा विषय आहे, त्यावेळीही या विषयाला कोणी विरोध केला नव्हता, तसेच वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जेव्हा हा चित्रपट दाखविण्यात आला, तेव्हाही कोणी विरोध केला नव्हता. मात्र प्रदर्शनाला तीन दिवस असतानाच याला विरोध करण्यात आला. यामागे कोणाचा तरी वैयक्तिक स्टंटबाजीचा उद्देश असावा असे वाटते.- संदीप पाटील, दिग्दर्शक, 'दशक्रिया'