पणजी : गोव्यात पैरासारख्या खेडेगावातील विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष गांवकर यांना नुकताच राष्ट्रीय पुरस्कार बहाल करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यालयांमध्ये विद्यादानाचे काम करणा-या शिक्षकांसाठी ही घटना स्फूर्तिदायी ठरलेली आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी ओढ तसेच जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य तसेच पैरा हायस्कूलचा इयत्ता दहावीच्या निकालही चांगला लावण्यासाठी केलेले प्रयत्न याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना ट्विटरवरुन कौतुकाची थाप दिली आहे.
गांवकर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या कारकिर्दीचा एकेक पैलूच उगडून दाखवला. पुरस्कारप्राप्त शिक्षक गांवकर यांनी विज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विज्ञान विषयाचे शिक्षक म्हणून काम करताना अनेक प्रयोगही त्यांनी केले. एका प्रश्नावर ते म्हणाले की,‘खाणींमधील माती पावसाळ्यात पाण्याबरोबर वाहत येऊन शेतांमध्ये साचते आणि शेतजमीन नापिक बनते. पैरा विद्यालयाच्या मुलांना घेऊन गांवकर यांनी यावर राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत यावर प्रयोग सादर केला. देशभरातून शिक्षकांकडून सादर झालेल्या वेगवेगळ्या प्रयोगांमध्ये पहिल्या दहा क्रमांकांमध्ये हा प्रयोग उत्कृष्ट गणला गेला. २00६ साली हा प्रयोग ओडिशा येथे सादर करण्यात आला. दूरदर्शनने त्यावर माहितीपटही काढला. माजी राष्ट्रपती दिवंगत अब्दुल कलाम यांनी या प्रयोगाची त्यावेळी मुक्त कंठाने स्तुती केली.’
तुमच्या एखाद्या प्रयोगाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे का? या प्रश्नावर गांवकर म्हणाले की, ‘ खाजन जमिनीतील खेकडे’या प्रयोगाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. बंगळुरु येथे विप्रोचे असिम प्रेमजी यांच्या हस्ते २0१५ साली त्यांना १ लाख रुपये रोख पुरस्कार व चषक प्रदान करण्यात आला. मयें भागात खाजन जमिनींचे प्रमाण जास्त आहे. तेथेच त्यांनी दुर्मीळ जातींच्या खेकड्यांवर संशोधन केले. पुणे येथे २0१0 साली भरलेल्या पर्यावरणमित्र परिषदेतही खेकड्यांवर प्रयोग सादर केला.
तुम्ही विद्यादान करीत असलेल्या शाळेचे वैशिष्ट्य काय?, असे विचारले असता ते म्हणाले की, ‘पैरा येथील माझ्या विद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत गेल्या दोन वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांची संख्या केवळ ५0 होते. अलीकडच्या दोन वर्षात त्यात वाढ होऊन १३0 पटसंख्या झालेली आहे. नापास झालेल्या रिपीटर्सनाही येथे संधी दिली जाते. अशा परिस्थितीतही यंदा दहावीचा निकाल ८८ टक्के लागला.’
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांशी संवाद साधला त्यात गावकर यांचा समावेश होता. ५ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले.
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कारप्राप्त अन्य शिक्षकांबरोबर गांवकर यांच्याशीही संवाद साधला. मोदींनी त्यांना त्यांचे विद्यालय पणजीपासून किती दूर आहे, विद्यालयात किती विद्यार्थी आहेत असे काही प्रश्न केले व त्याचबरोबर त्यांच्या उपलब्धीविषयीही प्रश्न केला. गांवकर म्हणाले की, ‘मोदीजी प्रश्न विचारत होते तेव्हा मनावर काहिसे दडपण होतेच परंतु इतकी वर्षे केलेल्या कार्याची माहिती देण्यास डगमगलो नाही. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदा, पर्यावरणमित्र तसेच इन्स्पायर इंडिया पुरस्काराची माहिती मी त्यांना दिली.’ मोदीजींनी व्टीटरवरुन त्यांचे कौतुक करताना त्यांच्या शाळेने इयत्ता दहावीच्या परीक्षेत निकालांबाबत केलेली उत्कृष्ट कामगिरी तसेच विज्ञानाविषयी विद्यादानाप्रती त्यांच्या योगदानाचा गौरव केला आहे.