पणजी : मळ्य़ातील युवकांच्या कार्याचा दखल दिल्लीच्या केंद्र सरकारच्या युवा क्रीडा आणि व्यवहार खात्याने घेतली आहे. ‘युवा पणजी’ या संघटनेने पाच वर्षाच्या काळात आपल्या कामाचा ठसा जिल्हा स्तरावरून देशपातळीवर उमटविला असल्याने त्यांना केंद्र सरकारचा यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक कार्याचा ध्यास घेऊन 27 डिसेंबर 2012 रोजी स्थापन झालेल्या ‘युवा पणजी’ या संघटनेने केलेल्या कामाची दखल 2015 मध्ये नेहरू युवा केंद्राने घेत त्यांना जिल्हास्तरीय पुरस्काराने गौरविले. त्यानंतर या क्लबला राज्य स्तरावरील नेहरू युवा केंद्राचाच पुरस्कारही याच वर्षी मिळाला. 2016 मध्ये गोवा राज्य सरकारच्या युवा आणि व्यवहार खात्यातर्फे ‘उत्कृष्ट युवा संघटना’ म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविले. याच खात्याने पुढे देशपातळीवरील पुरस्कारासाठी ‘युवा पणजी’ संघटनेचे नाव पाठविले. या संघटनेच्या कार्याची दखल घेत केंद्र सरकारने 2017 चा ‘राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर केला. या पुरस्कार मिळाल्यानंतर संघटनेचे संस्थापक सदस्य रघुवीर महाले यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, 35 सदस्य संख्या असलेल्या या संघटनेने लहान मुलांपासून युवकांर्पयत विविध खेळांचे मोफत शिबिरे, त्याचबरोबर पर्यावरणाला हानी न पोहोचता ‘इको फ्रेंडली’ गणोशमूर्ती निर्मितीवर भर, ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत मळ्य़ातील प्रसिद्ध झरीची वारंवार स्वच्छता, त्याचबरोबर आरोग्य शिबिरात मोफत औषधपुरवठा करणो अशी कामे केली जातात. त्याचबरोबर विविध क्षेत्रातही क्लबचे कार्य सुरू असते. पुढील वर्षी 2018 मध्ये 2 जानेवारीला जयपूर येथे होणा-या राष्ट्रीय युवा महोत्सवात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. अत्यंत अल्प काळात राष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटविणा-या ‘युवा पणजी’हा गोव्यातील पहिलीच संघटना ठरली आहे. याबद्दल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्य़ेकर यांनी संघटनेचे अध्यक्ष रुफिनो माँतेरो व सदस्यांचे अभिनंदन केले आहे.
ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी कार्य!आगामी काळात ज्येष्ठ नागरिकांची होणारी हेळसांड ओळखून त्यांच्यासाठी कार्य करण्याचा क्लबचा मानस आहे. पहिल्या टप्प्यात या लोकांसाठी वेळ घालविण्यासाठी सभागृहाची निर्मिती केली जाईल. त्याठिकाणी त्यांच्यासाठी आरोग्य चांगले रहावे याकरिता विविध उपक्रम राबविले जातील. महिलांसाठी केटरिंग प्रशिक्षण त्याचबरोबर इतर पूरक व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याचा आमचा मानस राहणार आहे. - रघुवीर महाले, संस्थापक सदस्य.