पणजी : राज्यात सुरु असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शेवटचे २ दिवस शिल्लक असताना गोव्याने बुधवारी पहिल्या सत्रात तब्बल १९ पदके मिळवित इतिहास रचला आहे. यामध्ये ११ सुवर्ण पदके, ६ रौप्य व २ कांस्य पदकाचा समावेश आहे.
बुधवारी मिळवलेल्या ११ सुवर्ण पदकांपैकी ६ सुवर्ण पदके ही स्क्वे मार्शल आर्ट मध्येच गोव्याने जिंकली आहे. तर ३ सुवर्ण पदके बॉक्सिंग व २ याॅटींग मध्ये मिळाली आहे. तसेच जी ६ रौप्य व २ कांस्य पदक मिळाली आहेत, ती देखील स्क्वे मार्शल आर्ट मध्येच मिळाली आहेत.
स्क्वे मार्शल आर्ट मध्ये अल्बर्ट फैराव, परशुराम नाग्गर्गुंडी, नितेश जल्मी, प्रगती भांगडे, रुची मांद्रेकर, व साक्षी सावंत यांनी सुवर्ण पदके, तसेच सोहेल शेख, मंजू मालगावी, मधुकर घोगले, महादेबी कंकाल, संपदा कवळेकर, व मिताली तामसे यांनी रौप्य पदक, तर शिवम मिश्रा, व सावित्री कोटी यांनी कांस्य पदक प्राप्त केले.या व्यतिरिक्त बॉक्सिंग मध्ये साक्षी, रजत व गौरव चौहान यांनी सुवर्ण पदक तर, याॅटींग मध्ये का कोएल्हो, व ड्वेन कोएल्हो यांनी सुवर्ण पदक मिळविले.
अजून अनेक पदकांची अपेक्षा गोव्याला आहे. या १९ पदकांचा जोरावर गोव्याची पदकांची संख्या एकूण ६९ झाली आहे. तर ११ सुवर्ण पदकामुळे सुवर्ण पदकाची संख्या २३ झाली असून गोवा आता टॉप १० मध्ये पोहचला आहे.