पणजी : गोव्यात येत्या दि. 1 ते 16 नोव्हेंबरच्या कालावधीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची गोवा सरकारची तयारी आहे. भारतीय ऑलिम्पीक असोसिएशनने त्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती करणारे पत्र गोव्याच्या क्रीडा खात्याने ऑलिम्पीक असोसिएशनला आणि केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनाही पाठवले आहे.
क्रीडा खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांनी शुक्रवारी पर्वरी येथील मंत्रलयात पत्रकारांशी अनौपचारिकपणो बोलताना ही माहिती दिली. यापूर्वीच्या कालावधीत गोवा सरकार राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करू शकले नाही. त्यामुळे भारतीय ऑलिम्पीक असोसिएशनने गोव्याला दहा कोटींचा दंड ठोठावला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्ली भेटीवर असताना केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजीजू यांच्यासमोर दंडाचा विषय मांडला व दंड माफ केला जावा, अशी विनंती केली. गोव्याला 2018 साली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा का आयोजित करता आल्या नाहीत ते मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांसमोर स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारताच उपमुख्यमंत्री आजगावकर म्हणाले, की आम्ही नुकतेच केंद्राला व ऑलिम्पीक संघटनेलाही पत्र लिहिले आहे. आता आमच्या सगळ्य़ा साधनसुविधा तयार आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाच्या आयोजनासाठी आम्ही सज्ज आहोत. आमची सगळी तयारी आहे. त्यासाठी दि. 1 ते 16 नोव्हेंबरच्या कालावधीत आम्हाला स्पर्धा आयोजित करण्यास परवानगी दिली जावी, अशी विनंती आम्ही केली आहे. दहा कोटींचा दंड आम्ही भरणार नाही. ते शक्य नाही, त्याऐवजी येथे क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी जो खर्च करावा लागेल, तो आम्ही करू.
दरम्यान, यापूर्वी मुलांच्या परीक्षा होत्या व गोव्यात निवडणुकांचाही काळ होता व तेथेच सगळ्या सुरक्षा व्यवस्थेची गरज होती. त्यामुळे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सरकार आयोजित करू शकले नाही, असे गोवा सरकारने यापूर्वी स्पष्ट केले आहे.