पणजी : नौदलाचे विमान कोसळण्याची घटना गोव्यात दुपारी बाराच्या सुमारास शनिवारी घडली. विमानाला आग लागल्याचे कळताच दोन्ही वैमानिकांनी पॅराशूटचा वापर करत विमानातून बाहेर उडय़ा टाकल्या. त्यामुळे ते बचावले. विमान लगेच वेर्णा औद्योगिक वसाहतीकडील पठारावर कोसळले व खाक झाले. विमानाचे छोटे विखुरलेले तुकडे सापडले आहेत. सविस्तर माहिती यापुढे मिळेल.
दाबोळी येथे नौदलाचा आयएनएस हंसा हा तळ आहे. तिथूनच हे विमान उडाले होते, असे कळते. लगेच विमानात बिघाड झाला व आग लागली. वेर्णा- कांसावलीच्या पट्टय़ात विमान कोसळले. हे विमान जर जवळच्याच वास्को येथील भागातील तेल टाक्या असलेल्या ठिकाणी कोसळले असते तर मोठी हानी झाली असती अशा प्रकारची चर्चा वास्कोवासियांत सुरू आहे. पठारावर विमान कोसळल्याने मनुष्यहानी झाली नाही, याविषयी गोमंतकीयांत समाधान व्यक्त होत आहे. गोव्यात नौदलाची विमाने कोसळण्याच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. विमान कोसळून मनुष्यहानी झाल्याच्याही घटना यापूर्वी झाल्याची नोंद आहे. सकाळच्यावेळी नौदलाच्या कवायती सुरू असतात. कवायतीवेळीही विमान दुर्घटना यापूर्वीच्या काळात झालेल्या आहेत. नौदलाचे विमान शनिवारी नेमके कोणत्या कारणास्तव कोसळले याची चौकशी संबंधित यंत्रणोकडून केली जाईल. विमान कोसळल्यानंतर लोकांना धुराचे प्रचंड मोठे लोट येताना दिसले.