फोंडा : मडकईतील श्री नवदुर्गा देवस्थानच्या व्यवस्थापनासाठी जात-पात, धर्म-भेद, रंक-राव, स्त्री-पुरुष असा कोणताही भेदभाव न करता कुळावी, भाविक, गावकरी आणि सेवेकरी यांचा समावेश असलेली समिती नियुक्त करावी तसेच पोर्तुगीजकालीन महाजनी कायदा रद्द करून हिंदू देवता, धार्मिक स्थळ आणि धर्माचे रक्षण करणारा कायदा अंमलात आणावा या मागणीसाठी श्री नवदुर्गा देवस्थानच्या कुळावी, भाविक, गावकरी आणि सेवेकरी यांनी दि. २१ आॅगस्ट रोजी एका दिवसाचे उपोषण करण्याचा निर्णय गुरुवारी नवदुर्गा देवस्थानच्या आवारातील सभेत घेतला. मडकईतील नवदुर्गा देवस्थानातील वादाबाबत गावकऱ्यांनी वेळोवेळी सरकारला निवेदने दिली असून सरकार दरबारी अजून त्यांची योग्य ती दखल घेतली गेल्याचे दिसत नाही. सध्या नवदुर्गा देवस्थानचे कुळावी, भाविक, गावकरी आणि सेवेकरी सातेरी, महिषासुरमर्दिनी, दुर्गा, नवदुर्गा अशा विविध रूपांत संपूर्ण राज्यभर अवतरलेल्या देवीच्या भाविकांशी संपर्क साधत असून सह्यांची मोहीमही राबवली जात आहे. या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून राज्यभर या मोहिमेबाबत जागृती व्हावी यासाठी हे उपोषण करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आज घेतलेल्या निर्णयाची प्रत दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, फोंडा पोलीस स्थानकाचे उपअधीक्षक, फोंडा उपजिल्हाधिकारी, फोंडा पोलीस निरीक्षक तसेच फोंडा तालुक्यातील देवस्थानांचे प्रशासक यांना देण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. दि. २१ रोजी निश्चित केलेल्या उपोषणावेळी श्री नवदुर्गादेवीचे नामस्मरण, भजन, प्रवचन, स्तोत्रपठण करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
नवदुर्गा भाविकांचे रविवारी उपोषण
By admin | Published: August 19, 2016 2:09 AM