पणजी : गोव्यात लोकसभा निवडणुकीवेळी यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे काही अस्तित्वच नाही अशी स्थिती आली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात युती आहे. पण, गोव्यात काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार देखील न करता दोन्ही जागांवर आपले संभाव्य उमेदवार जवळजवळ ठरविले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेसने विचार करावा, अशी स्थितीही गोव्यात राहिलेली नाही.लोकसभेच्या दोन जागांपैकी एक जागा काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे गोवा प्रभारी प्रफुल्ल पटेल यांची सोमवारी फोनवरून राष्ट्रवादीचे गोवा प्रदेशाध्यक्ष जुङो फिलिप डिसोझा यांच्याशी चर्चा झाली. आम्हाला काँग्रेसने एक जागा सोडायला हवी, असा मुद्दा जुङो फिलिप यांनी मांडला. पटेल यांनी आपण दोन दिवसांत राहुल गांधी यांना भेटणार आहोत एवढेच जुङो फिलिप यांना सांगितले. एकंदरीत प्रफुल्ल पटेल यांनाही गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यात किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना बळकट करण्यात रस राहिलेला नाही. 2017 च्या निवडणुकीवेळीच काँग्रेसने गोव्यात राष्ट्रवादीला गुड बाय केले व एकही जागा सोडली नाही. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीवेळीही राष्ट्रवादीला काँग्रेसने लोकसभेची जागा सोडली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2017 च्या निवडणुकीवेळी मोठी फुट पडली. त्यानंतर अजुनही पक्ष सावरलेला नाही. 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा मोठा पराभव झाला. चर्चिल आलेमाव हे एकमेव उमेदवार राष्ट्रवादीच्या तिकीटावर जरी निवडून आले तरी त्यांनी पक्षासोबत आपला मोठा संबंध ठेवलेला नाही.2009 सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी मात्र राष्ट्रवादीचे बळ गोव्यात मोठे होते. त्यावेळी काँग्रेसने उत्तर गोव्याची जागा राष्ट्रवादीला सोडली होती. राष्ट्रवादीतर्फे उत्तर गोव्यातून लढताना जितेंद्र देशप्रभू फक्त सहा-सात हजार मतांच्या फरकाने हरले होते. 2004 साली स्वर्गीय विल्फ्रेड डिसोझा हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर उत्तर गोव्यात लढले होते. त्यावेळी 88 हजार मते राष्ट्रवादीने प्राप्त केली होती.
गोव्यात लोकसभा निवडणुकीत यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्वच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 9:06 PM